करमाळा : कोरोना रुग्णांकडून शहरातील काही डॉक्टर व मेडिकल दुकानदार अव्वाच्या सव्वा बिल वसूल करत आहेत. या सर्व बिलांची तपासणी आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तहसीलदार समीर माने यांनी करावी, अशी मागणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केली आहे.
करमाळा शहरातील काही डॉक्टर चार ते पाच दिवस रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोना रुग्णाकडून ८० हजार रुपयांपासून ते दीड लाखापर्यंत शुल्क वसूल करत आहेत. रुग्णालयाच्या संपर्कात असलेले मेडिकल दुकानदार औषधांच्या नावाखाली ३० ते ४० हजार रुपये उकळत आहेत. अशाप्रकारे मनमानी बिले रुग्णाच्या नातेवाईकांच्या माथ्यावर मारली जात आहेत. शासनाच्या नियमानुसार कोरोना उपचाराचे दर ठरलेले असताना डॉक्टरांकडून कसलेही अधिकृत बिल दिले जात नाही. औषध दुकानदाराकडूनही अधिकृत बिल दिले जात नाही. निकृष्ट दर्जाच्या कंपनीची जास्त एमआरपी असलेली जास्त नफ्याची औषधे रुग्णांच्या गळ्यात मारली जात आहेत.
यावर प्रशासनातील कोणचेही नियंत्रण नाही. ज्या कोरोना रुग्णाला जास्तीचे बिल देण्यात आले आहे, अशा रुग्णांनी स्वत:कडील बिलासह तहसीलदार समीर माने यांच्याकडे तक्रार करावी व एक प्रत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या नावाने तयार करून ती शिवसेनेच्या कार्यालयात जमा करावी, असे आवाहन केले आहे.
शिवसेना याचा पाठपुरावा करुन न्याय देण्याचा प्रयत्न करेल. करमाळा शिवसेना व शिवसेना मदत कक्षातर्फे आरोग्य मदत केंद्र उभारण्यात आली आहेत. कोरोना रुग्णांना औषध, बेड, उपचार या संदर्भात काही अडचणी असल्यास करमाळा शिवसेना पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केले आहे.
--
एखाद्या कोरोना रुग्णाकडून डॉक्टरने नियमापेक्षा जास्त पैसे घेतले असतील तर अशा रुग्णांनी आमच्याकडे तक्रारी कराव्यात. डॉक्टरांनी घेतलेल्या बिलाच्या रकमा, त्याच्या पावत्या, औषध दुकानदारांची अधिकृत बिले सोबत जोडावीत. याबाबत चौकशी करून योग्य ती कारवाई करू.
- डाॅ. सागर गायकवाड
तालुका वैद्यकीय अधिकारी.