कोरोनाचा परिणाम; हप्ता भरायला उशीर होतोय; बँक वसुलीवाला येतोय घरी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 07:08 PM2021-07-31T19:08:06+5:302021-07-31T19:08:40+5:30
कर्जप्रकरण : खासगी बँकांचा तगादा संपता संपेना
सोलापूर : कोरोनामुळे कार्पोरेट कंपन्यांचे दिवाळे निघाले आहे. अनेक आर्थिक संस्था, औद्योगिक कंपन्या अडचणीत सापडल्या आहेत. अशा कठीण काळात अनेकांच्या नोकऱ्याही धोक्यात आल्या आहेत. एकीकडे आर्थिक अडचणी सुरू आहेत, तर दुसरीकडे बँकांचा तगादा मागे लागला आहे. कर्जाचा हप्ता भरायला जरा जरी उशीर झाला तरी बँकेचा वसुलीवाला दारासमोर हजर राहतो.
सक्तीने कर्ज वसूल करू नये, असे आदेश रिझर्व बँकेकडून असतानाही खासगी वित्तीय संस्थांकडून सक्तीने वसुली सुरू आहे. पहाटे पाच वाजल्यापासूनच थकबाकीदारांचा शोध सुरू होतो. थकीत हप्ता दिल्याशिवाय वसुली अधिकारी पिच्छा सोडत नाहीत. त्यामुळे आर्थिक विवंचनेत असलेल्या थकबाकीदारांची डोकेदुखी वाढली आहे. याउलट राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये थकबाकीदारांना सवलत दिली जात आहे. राष्ट्रीयीकृत बँकांच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना काळात तब्बल दोन वर्षांपर्यंत हप्ते न भरल्यास दंडात्मक कारवाई होणार नाही.
दुकाने बंद
कोरोना काळात व्यापारपेठा बंद असल्यामुळे व्यापाऱ्यांचीही मोठी अडचण झाली आहे. बहुतांश व्यापारी बँकांकडून कर्ज घेऊन व्यवसाय सुरू ठेवतात. एकाएकी कोरोना काळात व्यापार पूर्णपणे ठप्प झाल्यामुळे त्यांचा संपूर्ण व्यवसाय उलटा-सुलटा झाला. आर्थिक देवाण-घेवाण पूर्ण थांबल्यामुळे बँकांचे हप्तेही थकले. त्यामुळे बँकांकडून व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होत आहे.
पहाटे पाच वाजताच बँकांच्या वसुली अधिकाऱ्यांकडून फोनाफोनी सुरू होते. कुठे आहात... सातपर्यंत घरी येणार आहोत. आज हप्ता भरावा लागेल. अन्यथा तुमच्यावर दंडात्मक कारवाई होईल, अशी भीती दाखवली जाते.
- राजाराम पाटील
पोलिसांकडे दिली तक्रार
खासगी बँकेकडून दुचाकी वाहनासाठी कर्ज घेतले आहे. सहा महिने नोकरी नव्हती. त्यामुळे आर्थिक अडचण निर्माण झाली. हप्तेही थकले. त्यामुळे वसुली अधिकाऱ्यांनी माझी दुचाकी उचलून नेली. कंपनी व त्यांच्या प्रतिनिधी विरोधात पोलिसांकडे तक्रार दिली आहे.
- राजा बागवान
राष्ट्रीयीकृत बँकांकडून कोणतीही कारवाई नाही
रिझर्व बँकेकडून सूचना आल्यानंतर आम्ही सक्तीने कर्ज वसुली पूर्णपणे थांबवली. कोरोना काळात दोन वर्षांपर्यंत कर्जदार हप्ते न भरल्यास त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही. फक्त व्याजदर नियमित सुरू राहील. ज्यांना हप्ते भरता येतील त्यांनी भरावेत. ज्यांची अडचण आहे, त्यांनी टप्प्याटप्प्याने हप्ते भरावेत, अशा सूचनाही दिल्याचे जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक प्रशांत नाशिककर यांनी सांगितले.