माढा : माढा तालुक्यातील दारफळ सीना येथील बार्शीत सेवेत असणा-या पोलिस कर्मचा-यास कोरोनाची लागण झाल्याने दारफळ येथील परिसर सील करण्यात आला आहे़ याबाबतची माहिती समजताच गावात खळबळ उडाली आहे़ त्यामुळे गावातील सर्व व्यवसाय बंद ठेवण्यात आले आहेत.
दरम्यान, या घटनेचे तातडीने गांभीर्य लक्षात घेऊन माढ्याचे तहसीलदार राजेश चव्हाण यांनी गावास भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली़ माढा परिसरात पहिल्यांदाच रुग्ण आढळल्याची घटना घडली आहे. कोरोना पॉझिटिव्ह पोलिस कर्मचारी मागील तीन चार दिवसांपूर्वीच गावी आले होते़ त्यानंतर कामावर गेल्यावर त्यांना त्रास जाणवू लागल्याने त्यांचा स्वॅब घेतला़ शनिवारी सकाळी त्या स्वॅबचा अहवाल प्राप्त झाला त्यात ते पॉझिटिव्ह आढळून आले़ त्यानंतर वैद्यकीय अधिकारी पलंगे यांनी या ठिकाणी भेट देऊन कुटुंबियांची व संपर्कातील व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्याच्या सुचना केल्या़ यावेळी पोलीस नाईक श्रीराम पोरे व शेख हजर होते.