सोलापूर : कोरोना साथीमुळे शासनाने निधी थांबविल्याने गरिबांच्या घरकुलांचे स्वप्न साकार करण्यासाठी असलेल्या चार योजनांची कामे थांबली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ७,९२७ लाभार्थ्यांचे काम थांबले आहे.
झेडपीच्या जिल्हा विकास यंत्रणेमार्फत गरिबांचे सर्वेक्षण करून बेघरांना घरकूल बांधून देण्याची योजना सन २०१६-१७ पासून राबविली जात आहे. यामध्ये केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री आवास व राज्य शासन पुरस्कृत रमाई, शबरी, पारधी आवास योजनेचा समावेश आहे. प्रधानमंत्री योजनेतून २३,२५८ घरकुलांचे उद्दिष्ट होते. यातील १७,९२३ घरकुले बांधून पूर्ण झाली आहेत. उर्वरित ५,६०५ घरकुलांचे काम निधीअभावी थांबले आहे.
जिल्ह्यातील पूर्ण घरकुलांची स्थिती
- - रमाई आवास योजनेतून सन २०१६-१७ ते २०१९-२० या चार आर्थिक वर्षात २३,२५८ घरकुले बांधणीचे उद्दिष्ट आहे. गतवर्षीपर्यंत १०,१५६ घरकुले बांधून पूर्ण करण्यात आली. पण सन २०१९-२० या वर्षाकरिता मंजूर केलेल्या २ हजार २४५ घरकुलाच्या कामासाठी निधीच आलेला नाही.
- - शबरी आवास योजनेचे ५४३ घरकुलांचे उद्दिष्ट होते. तीन वर्षांत ५०९ घरकुले बांधण्यात आली. चालू वर्षी ४४ घरकुलांच्या कामासाठी निधीच दिलेला नाही. पारधी आवास योजनेत गेल्या तीन वर्षात २१२ घरकुलांचे उद्दिष्ट होते. त्यातील १७९ घरे बांधण्यात आली.
- - आता चालू वर्षी ३३ घरांचे काम हाती घेण्याबाबत शासनाचे मार्गदर्शन आलेले नाही. अपूर्ण असलेल्या घरकुलांना निधी व वाळूची कमतरता असल्याचे सांगितले जात आहे.
जागा खरेदीला दिला निधीपंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेंतर्गत गरिबांना घरासाठी जागा खरेदीसाठी पैसे देण्याची तरतूद आहे. या योजनेसाठी पात्र ठरलेल्या ११९ लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी ४३ लाख १४ हजार १३७ रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे. चालू आर्थिक वर्षात कोरोना महामारीमुळे शासनाने सर्व योजनांची कामे तहकूब ठेवली आहेत. फक्त आरोग्याच्या कामाला प्राधान्य दिल्याने घरकूल योजनांना निधी मिळालेला नाही. शासनाचे पुढील आदेश आल्यावर काम सुरू करू. -प्रकाश वायचळ, मुख्य कार्यकारी अधिकारी