" टू-फोर-डी " तणनाशकाने द्राक्षबागांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:14 AM2021-07-23T04:14:53+5:302021-07-23T04:14:53+5:30
बंदीची मागणी : पाचशे मीटरवरून बसते झळ लोकमत न्यूज नेटवर्क सोलापूर : उसाच्या फडात किंवा मोकळ्या जमिनीतील तण मारण्यासाठी ...
बंदीची मागणी : पाचशे मीटरवरून बसते झळ
लोकमत न्यूज नेटवर्क
सोलापूर : उसाच्या फडात किंवा मोकळ्या जमिनीतील तण मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या '' टू-फोर-डी '' या तणनाशकामुळे नजीकच्या द्राक्ष बागा आणि पपईच्या बागेचे नुकसान होते. त्यामुळे '' टू-फोर-डी '' या तणनाशकाच्या वापरावर शासनाने बंदी घालण्याची मागणी शेतकऱ्यांतून केली जात आहे.
द्राक्ष बागांवर तणनाशक मारण्याचे प्रकार वारंवार घडतात. तसेच बागांशेजारील उसाच्या फडात किंवा मोकळ्या जमिनीवरील तण नष्ट करण्यासाठी शेतकरी '' टू-फोर-डी '' या जालीम तणनाशकाचा वापर करतात. त्यामुळे परिसरातील ५०० मीटर अंतरावर असलेल्या द्राक्ष बागांना त्याचा फटका बसतो. द्राक्षांच्या वेली आणि पपईची पाने या तणनाशकाने जळून जातात. त्यांची वाढ खुंटते. फुले आणि फळे झडून जातात. द्राक्ष बागांच्या पट्ट्यात हा प्रकार सर्रास घडत असतो. त्यातून शेतकऱ्यांच्या आपसातील तक्रारी वाढत आहेत.
'' टू-फोर-डी '' च्या वापराने द्राक्षाच्या कोवळ्या पानांवर डाग दिसतात. काही वर्षापर्यंत ही विकृती राहते. कोवळी पाने खराब होतात. फुले येणे थांबते. पपईच्या पानांना शॉक बसून ती जळतात. काही मैलाच्या अंतरावर त्याच्या फवारणीचा फटका बसतो. फवारताना तुषार वाऱ्याने पसरतात. सुप्त राग असल्याने काही शेतकरी जाणीवपूर्वक या तणनाशकाचा वापर केल्याने आपसातील तंटे वाढत आहेत. त्यामुळे त्याच्या वापरावर बंदी घालण्याची मागणी करण्यात येत आहे.
------
पपई आणि द्राक्षांसाठी टू-फोर-डी हे तणनाशक जालीम आहे. तणांच्या समूळ उच्चाटनासाठी शेतकरी त्याचा वापर करतात. मात्र आजूबाजूच्या शेतकऱ्यांचे त्यामुळे मोठे नुकसान झाल्याची असंख्य उदाहरणे आहेत. त्याचा वापर तातडीने थांबवावा.
- आदेश अंकुश मोरे
पपई उत्पादक शेतकरी, कुरनूर
--------
कोणतेही तणनाशक मारताना काळजी घ्यावीच लागते. वाऱ्याची दिशा पाहून त्याची फवारणी करावी. लहान तुषार उडाले तरी नुकसान होऊ शकते. टू-फोर-डी मुळे सरसकट वनस्पती जळतात. योग्य ठिकाणीच त्याचा वापर केला पाहिजे. बंदी घालण्याची मागणी असली तरी ती संयुक्तिक नाही.
- रवींद्र माने
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सोलापूर