coronavirus; ऑर्किस्ट्रा बारच्या नावाखाली चालणारे डान्सबारही शांत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 11:24 AM2020-03-18T11:24:47+5:302020-03-18T11:31:27+5:30
कोरोना व्हायरसमुळे घेतली खबरदारी; राज्यातील मनोरंजन नाट्यगृहे बंद करण्याचे आदेश
संताजी शिंदे
सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यात ठिकठिकाणी ऑर्किस्ट्रा बारच्या नावाखाली चालणारे डान्स बार बंद करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाच्या करमणूक कर विभागाने दिले आहेत. कोरोना व्हायरसमुळे ही खबरदारी घेण्यात आली आहे.
जगभर थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रात अनेक उपाय योजले जात आहेत. राज्यातील मनोरंजन नाट्यगृहे बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत़ यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील ऑर्किस्ट्रा बार व डान्स बार बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मंगळवारी दुपारी सोलापुरातील ऑर्किस्ट्रा बारच्या नावाखाली चालणारे डान्स बार बंद करण्याचे आदेश करमणूक कर विभागाच्या वतीने देण्यात आले आहेत़ डान्स बारमध्ये येणारे बहुतांश ग्राहक हे शेजारच्या जिल्ह्यातील व कर्नाटक, आंध्रप्रदेशातील असतात. चंदेरी दुनियेत बारबालेच्या गाण्याचा, नृत्याचा आनंद घेण्यासाठी ही मंडळी खासकरून सोलापुरात येत असतात. बेळगाव, विजयपूर, गुलबर्गा, इंडी आदी कर्नाटकातील भागातून येणारा ग्राहक वर्ग डान्स बारमध्ये येतो.
दि.३१ मार्चपर्यंत ऑर्किस्ट्रा बार सुरू ठेवण्यात येऊ नये असे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत. आॅर्केस्ट्रा बार बंद झाल्याने सध्या सोलापुरातील रात्रीची चंदेरी दुनिया अंधारात गेली आहे.
सोलापुरात १६ ते १८ आॅर्केस्ट्रा बार...
सोलापुरात सध्या हैदराबाद रोडवर रसिक ऑर्किस्ट्रा बार व राजश्री आॅर्केस्ट्रा बार, बार्शी रोडवर सुखसागर ऑर्किस्ट्रा बार, अविराज आॅर्केस्ट्रा बार, पुणे रोडवर पॅराडाईज आॅर्केस्ट्रा बार, सुयोग ऑर्किस्ट्रा बार, न्यू विनय आॅर्केस्ट्रा बार, जय मल्हार आॅर्केस्ट्रा बार, गॅलक्सी आॅर्केस्ट्रा बार, विजापूर रोडवर आम्रपाली आॅर्केस्ट्रा बार, नागेश डान्स बार, कलवरी ऑर्किस्ट्रा बार, गुलमोहर आॅर्केस्ट्रा बार,नान्नज परिसरात दोन आॅर्केस्ट्रा बार व अन्य ठिकाणी असे एकूण १६ ते १८ आॅर्केस्ट्रा बार चालतात.
बारबाला व कर्मचारी घरी जाण्याच्या तयारीत...
- तब्बल १४ दिवसांची सुट्टी मिळाल्याने शहर व जिल्ह्यातील आॅर्केस्ट्रा बारमध्ये काम करणाºया बारबाला, गायक, संगीतकार आदी सर्व कलाकार हे आपल्या गावी जाण्याच्या तयारीत आहेत. बहुतांश बारबाला व कलाकार हे पश्चिम बंगाल, मुंबई या ठिकाणचे रहिवासी आहेत. आॅर्केस्ट्रा बारच्या मालकांनी सर्वांना घरी जाण्यास सांगितले आहे.