सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर बार्शी अक्कलकोट नगरपालिका क्षेत्रात कोरोनाचे रुग्ण वाढल्यामुळे जिल्हा प्रशासन अधिकारी पंकज जावळे यांची महानगरपालिकेकडे वर्ग केलेली सेवा रद्द करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी घेतला आहे.
कोरोनाची साथ सुरु झाल्यावर प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सोलापूर जिल्ह्यात १३ मार्च रोजी साथरोग नियंत्रण कायदा लागू केला, त्यानंतर सोलापूर शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत गेले. शहरातील कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी शंभरकर यांनी जिल्हा प्रशासन अधिकारी पंकज जावळे यांची सेवा महापालिकेकडे वर्ग केली. तेव्हापासून जावळे हे महापालिकेकडे उपायुक्त म्हणून कार्यरत होते. त्यांच्याकडे आरोग्याचा विशेष पदभार देण्यात आला होता.
आता जिल्ह्यातील पंढरपूर बार्शी अक्कलकोट नगरपालिका क्षेत्रात कोरोनाचे रुग्ण वाढत चाललेले आहेत. नऊ आॅगस्ट रोजी नगरपालिका क्षेत्रात ५ हजार ५५६ रुग्ण आढळल्याची नोंद झाली आहे. तर इकडे सोलापूर महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याचे दिसून येत आहे. तसेच शासनाने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अतिरिक्त आयुक्त व उपायुक्त पदाच्या रिक्त जागा भरल्या आहेत. त्यामुळे याची दखल घेत जिल्हाधिकारी शंभरकर यांनी जावळे यांची महापालिकेकडील नियुक्ती रद्द केली व त्यांना नगरपालिकेतील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचना केल्या आहेत.