बार्शी-येरमाळा रस्त्यावर सदोष चारीमुळे पाथरीत शेतात शिरले पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:27 AM2021-09-17T04:27:11+5:302021-09-17T04:27:11+5:30
बार्शी : पाथरी येथील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळांतर्गत बार्शी-येरमाळा रस्त्यावर महामार्गाचे काम सुरु आहे. पाथरी ...
बार्शी : पाथरी येथील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळांतर्गत बार्शी-येरमाळा रस्त्यावर महामार्गाचे काम सुरु आहे. पाथरी गावाजवळील पुलाच्या सदोष कामामुळे या आठवड्यात झालेल्या पावसाचे पाणी दोन शेतकऱ्यांच्या शेतात शिरून सहा एकर सोयाबीन पीक पाण्यात तरंगू लागले. या पाण्यात जवळपास ७ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी तहसीलदार यांच्याकडे केली आहे.
हे पाणी या पाथरी हद्दीत शेतकरी बाबासाहेब गायकवाड व लालासाहेब गायकवाड यांच्या शेतात शिरले. त्यांच्या सहा एकरावर सोयाबीन पीक आहे. पिकास ८५ दिवस पूर्ण झाले आहेत. त्यास शेंगाही आल्या आहेत.
या गावाजवळूनच जाणाऱ्या येरमाळा मार्गावर रस्त्याचे काम सुरु आहे. महामार्गावर पूर्व- पश्चिम बाजूस पाणी जाण्यासाठी पूल बांधण्यात आला आहे. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी उत्तर- दक्षिण चारी करण्यात आली होती. पण काम सदोष झाल्याने चारीतून पावसाचे पाणी वाहून जाण्याऐवजी ते उलट येऊन शेतामध्ये साठले. या पाण्यात सोयाबीन पीक पाण्यामध्ये बुडून सात लाखांचे नुकसान झाले. मागील वर्षीही अशीच परिस्थिती शेतकरी गायकवाड यांच्या शेतात निर्माण झाली होती.