सोलापूरच्या केळीला अरब राष्ट्रात मोठी मागणी, कंदर, अकलूज येथुन निर्यात, परदेशात मागणी वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 12:48 PM2018-01-25T12:48:18+5:302018-01-25T12:49:38+5:30
ज्वारीसाठी प्रसिद्ध असलेल्या सोलापुरातून सध्या नगदी पीक म्हणून ओळख असलेल्या केळीला अरब राष्ट्रातून मोठी मागणी होत आहे. सकस आणि दर्जेदार असलेली केळी कंदर आणि अकलूज येथून निर्यात केली जात आहे.
संताजी शिंदे
सोलापूर दि २५ : ज्वारीसाठी प्रसिद्ध असलेल्या सोलापुरातून सध्या नगदी पीक म्हणून ओळख असलेल्या केळीला अरब राष्ट्रातून मोठी मागणी होत आहे. सकस आणि दर्जेदार असलेली केळी कंदर आणि अकलूज येथून निर्यात केली जात आहे.
सोलापूर जिल्ह्यात ६ हजार हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड होते. एकरी ३० टन केळीचे उत्पादन होत असते. एकूण उत्पादनाच्या २० टक्के केळीची ओमान, जेद्दाह, सौदी अरब, अफगाणिस्तान आदी देशात निर्यात केली जाते. सध्या १५ दिवसांतून १ ते २ कंटेनर निर्यात केली जाते. जिल्ह्यात केळीचे उत्पादन वाढत असून सध्या बाजारात चांगला भाव मिळत आहे. अरब राष्ट्रात जाणारी केळी कच्ची असतानाच झाडावरून काढली जाते. या केळीला कोणत्याही प्रकारची रासायनिक फवारणी केली जात नाही. योग्य तापमानात ही केळी मुंबई व तेथून जहाजातून अरब राष्ट्रात पाठविण्यात येते. १२ ते १५ दिवसात हा माल अरब राष्ट्रात पोहचतो. माल पोचेपर्यंत योग्य तापमानात नैसर्गिक पद्धतीने पिकून तयार होतो.
सध्या सोलापूरच्या केळीला परदेशातून मागणी वाढत आहे. सौदी अरबसह अन्य राष्ट्रांमध्ये क्वॉलिटीची (गुणवत्तेची) केळी म्हणून याची ओळख आहे. किलोला निर्यातदाराकडून ३० रुपयांचा दर मिळत आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथील अनेक शेतकºयांनी सध्या केळीच्या उत्पादनावर जास्त भर दिला आहे. ४० रुपये प्रतिकिलो भावाने विकल्या जाणाºया ज्वारीकडे पाठ फिरवून ३० रुपये किलो भावाने विकल्या जाणाºया केळीच्या पिकाला करमाळा तालुक्यातील शेतकºयांनी प्राधान्य दिले आहे.
-----------------------
सोलापूरची दर्जेदार केळी अशी परदेशात ओळख आहे. येथील केळीला मोठी मागणी असून दरही चांगला मिळत आहे. रशिया आणि ग्रीस या देशातही सोलापूर जिल्ह्यातून केळी जातात; मात्र हे प्रमाण कमी आहे. वाहतुकीचा कालावधी आणि त्याचा टिकाऊपणा लक्षात घेता रशियासारख्या देशात मोठ्या प्रमाणात केळी निर्यात करता येत नाही. जलद वाहतुकीच्या दृष्टीने भविष्यात विमानाद्वारे निर्यात करण्यासंदर्भात विचार केला जात आहे.
- किरण डोके, निर्यातदार, कंदर.
---------------------------
जिल्ह्यात केळीची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. केळीला बाजारात मोठी मागणी असून उत्पादनाच्या एकूण २0 टक्के माल परदेशात निर्यात केला जातोे. निर्यात वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न होत आहेत. केळीच्या पिकाला बाजारात मागणीही मोठ्या प्रमाणात होत आहे.
- बसवराज बिराजदार,
जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी.