बार्शीतील मागासवर्गीयांना घरकूल देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:15 AM2021-07-23T04:15:00+5:302021-07-23T04:15:00+5:30
बार्शी : तालुक्यात महाआवास अभियान राबवून बेघर, भूमिहीन, वंचित मागासवर्गीयांना घरकूल योजनेंतर्गत योजनेचा लाभ देण्याची मागणी ...
बार्शी : तालुक्यात महाआवास अभियान राबवून बेघर, भूमिहीन, वंचित मागासवर्गीयांना घरकूल योजनेंतर्गत योजनेचा लाभ देण्याची मागणी दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुनील अवघडे यांनी बार्शी तालुका गटविकास अधिकारी शेखर सावंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
बार्शी तालुक्यातील बहुतांश गावात बेघर भूमिहीन व हक्काचे घर नसलेला मागासवर्गीय समाजातील लाेकांची संख्या मोठी आहे. त्यांना शासनाच्या घरकूल योजनेंतर्गत घरकुलाचा लाभ घेता येत नाही. मागासवर्गीय समाज हा गावठाणाच्या किंवा सरकारी जागेवर वर्षानुवर्षे राहत असला तरी त्यांना त्या सरकारी जागेवर हक्काचे घर बांधता येत नसल्याने त्यांना शासनाच्या घरकूल योजनेपासून वंचित राहावे लागत आहे. जेथे मागासवर्गीय गावठाणाच्या जागेवर अतिक्रमण करून राहतात अशा पात्र बेघर व्यक्तीस तेथे अतिक्रमण नियमानुसार करून घरकूल बांधण्याची परवानगी द्यावी, ज्यांना मालकीची घर जागा नाही त्यांना घरकूल योजनेपासून वंचित राहावे लागते, अशा पात्र बेघर व्यक्तीस पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकूल जागा खरेदी अर्थसाहाय्य योजनेंतर्गत लाभ देऊन त्यांना या घरकुलाचा लाभ द्यावा, अशी मागणी केली.
यावेळी शहर अध्यक्ष संदीप आलाट, तालुका उपाध्यक्ष उमाकांत ढावारे, जिल्हा उपाध्यक्ष नीलेश खुडे, तालुकाध्यक्ष संगीतराव शिंदे, कैलासराव अडसूळ, वैराग प्रमुख नागेश ठोंबरे, तालुका कार्याध्यक्ष महादेव भिसे, युवक आघाडीप्रमुख संतोष बगाडे उपस्थित होते.