सोलापूर : शेंगा तेल, करडी, तीळ, जवस, नारळ, बदाम, अक्रोड, भुईमूग, सूर्यफूल आणि मोहरी तेल सोलापुरात पारंपरिक पद्धतीने घाण्यावर काढण्यात ते असल्याने या तेलास देशभरातून मागणी वाढली आहे. विशेष म्हणजे सध्या बाजारात बदाम, अक्रोड, करडी तेलाची चलती असल्याचे दिसून येत आहे. कोरोनानंतर नागरिक आपल्या आरोग्याच्या दृष्टीने सजग झाल्यामुळे नैसर्गिक घाणा तेलाच्या मागणीत २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. आहारात रिफाइंड तेलाचा जास्त वापर केल्याने रक्तदाब, स्थूलता, हृदयरोग आदी विकारांना आमंत्रण मिळते, तर हृदयासाठी ऑलिव्ह, सूर्यफूल, करडी, सोयाबीन, मका, राइस ब्रान या प्रकारचे तेल चांगले मानले जाते, असे मत हृदयरोगतज्ज्ञ आणि आहारतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
---
तेलाचे आहारातील प्रमाण कमीच
असले पाहिजे, एका माणसाने दररोज १५-२० ग्रॅम तेलाचेच सेवन करावे, याप्रमाणे चार व्यक्तींच्या कुटुंबाला महिन्याला दोन किलो तेल पुरेसे ठरते. जर आपण आहारात रिफाइंड २०० ग्रॅम तेल वापरत असाल तर घेण्याचे तेल केवळ ७५ ग्रॅम वापरावे लागते, त्यामुळे पैसे आणि आरोग्य यांची बचत होते.
पेंड आणि पीनट बटरचा वापर वाढला
सध्या जिल्ह्यात गावागावांत बंद पडलेले ६० घाणे सुरू झालेले आहेत. यामुळे एका घाण्यापासून १ टन पेंड पशूसाठी उपलब्ध होत असल्याने पशुपालकांच्या वारणीचा प्रश्न सुटलेला आहे, तर घाण्यातून मिळालेल्या पीनट बटरचा वापर शेतीत खत म्हणून वाढलेला आहे.
बदाम आणि अक्रोड तेलाला मागणी
मुंबई, पुणे, बंगळुरू, मद्रास, हैदराबाद दिल्ली, कर्नाटक या ठिकाणी घाण्याचे तेल पाठविले जाते आहे. यामध्ये खासकरून बदाम आणि अक्रोड तेलाचा वापर त्वचारोग, लहान मुलांची पचनक्रिया, केसासाठी केला जात आहे, म्हणून जास्त मागणी आहे.
रिफाइंड तेलापेक्षा घाण्यावरील नैसर्गिक तेल आरोग्यासाठी कायमच लाभदायक आहे. घाण्याच्या तेलामुळे तेलातील नैसर्गिक तत्त्व शरीराला भेटतात, त्यामुळे शरीरावर काही परिणाम होत नाही.
- डॉ. स्वाती स्वामी, आहारतज्ज्ञ
---
कोरोनानंतर आरोग्याच्या दृष्टीने नागरिक सतर्क झाल्याने पारंपरिक पद्धतीने मिळत असलेल्या तेल घाण्याकडे लोक वळले आहेत. त्यामुळे नैसर्गिक घाणा तेलाच्या मागणीत २० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
- प्रा. संजय हिरेमठ, तेल उत्पादक
---