मंदिरं सुरू झाली तरीही कोमजलेल्या फूल बाजारात टवटवीत फुलांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2021 05:37 PM2021-10-11T17:37:04+5:302021-10-11T17:37:11+5:30
व्यापाऱ्यांची कसरत ; मंगळवेढा, पंढरपूर, बोरामणी, माळशिरसरमधून आवक
सोलापूर : सण उत्सवाच्या काळात बंद मंदिरे सुरु झाली, तर दुसरीकडे अति पाऊस झाल्याने सर्वत्र फुले काळवंडली या विरोधाभास परिस्थितीत कोमेजलेल्या फूल बाजारात टवटवीत फुलांची मागणी होत आहे.
काही व्यापारी आता मंगळवेढा, पंढरपूर, बोरामणी, माळशिरस, दक्षिण सोलापूर येथून ताजी फुले मागविण्यासाठी कसरत करत आहेत; मात्र अति पावसाच्या परिणामामुळे फुले पावसाने काळी पडली. यामुळे आवक जास्त अन् दर कमी अशी स्थिती होती. नुकताच संपलेला श्रावण, गणेशोत्सव आणि सुरु असलेला नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी या सगळ्याच सणांसाठी झेंडूच्या फुलांची मागणी मोठ्या प्रमाणात असते. गेल्या महिनाभरात जिल्ह्यात अति पाऊस झाला असून याचा फटका फूल शेतीला झाला आहे. मंदिर सुरु होण्याच्या काळात बाजारामध्ये काळवंडलेल्या फुलांची आवक मोठ्या प्रमाणात झाली. दुसरीकडे दोन वर्षांनंतर प्रथमच देवाचे दर्शन होणार असल्याने भाविकांनी कोमेजलेल्या फूल बाजारात टवटवीत फुलांची मागणी केली. यामध्ये फूल व्यापाऱ्यांची कसरत होत आहे. हा व्यापारी मंगळवेढा, पंढरपूर, बोरामणी, माळशिरस, दक्षिण सोलापूर येथील शेतकऱ्यांकडून फुले मागवित आहेत.
आवक वाढली; मात्र पावसाचा परिणाम
सणासुदीच्या दिवसांत झेंडूच्या फुलांना आणि इतर फुलांनाही बाजारपेठेत मोठी मागणी असते. गतवर्षीच्या नवरात्रोत्सवाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी फुलांची आवक २० टक्क्यांनी वाढली; मात्र मागील आठवड्यापर्यंत सुरू असलेल्या पावसामुळे इतर पिकांबरोबरच नगदी पीक म्हणून गणल्या गेलेल्या फूलशेतीचे मोठे नुकसान झाले. पाऊस व खराब हवामानामुळे फुलांचे मोठे नुकसान झाले असून, गतवर्षीच्या तुलनेत यंदा अर्धेच उत्पादन घटल्याने फूल उत्पादक शेतकरी हतबल झाले आहेत.
फुलांचे दर
- झेंडू १०-५०,
- शेवंती ६०-८०,
- इंग्लिश गुलाब- १५०-२००,
- चायनीज गुलाब २५०-३००,
- लीली २०,
- साधा गुलाब ८०-१००,
- निशिगंधा १००-१५०,
- गलांडा १०.
---
नवरात्रोत्सव, तसेच मंदिरे खुली होत असल्यामुळे बाजारात फुलांची आवक जास्त झाली; मात्र मागील आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे फूलशेतीचे मोठे नुकसान झाले, यामुळे फुलांना दर कमी मिळाला.
-श्रीशैल घुली, फूल विक्रेते
आम्ही दरवर्षी झेंडूची लागवड करत असून, झेंडूला मोठ्या प्रमाणात बाजारात मागणी आहे. या वेळेस पावसामुळे नुकसान झाले, म्हणून दर कमी आहेत; मात्र दसऱ्यानिमित्त चांगला दर मिळेल अशी आशा आहे.
-सूर्यकांत पाटील, फूल उत्पादक, शेतकरी