सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त एन. के. पाटील तडकाफडकी कार्यमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2021 06:42 PM2021-11-02T18:42:35+5:302021-11-02T18:42:43+5:30
सहा महिन्यात दुसरा प्रकार : पाटील मागणार शासनाकडे दाद
साेलापूर : महापालिका प्रशासनात दिवाळीच्या पहिल्याच दिवशी ‘बाॅम्ब फुटला’. आयुक्त पी. शिवशंकर यांनी उपायुक्त एन. के. पाटील यांना अकार्यक्षम ठरवून कार्यमुक्त केले. आयुक्तांचा हा निर्णय वैयक्तिक आकसातून आहे. याविरुध्द शासनाकडे दाद मागणार असून मॅटमध्ये जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
माेहाेळ नगरपालिकेत मुख्याधिकारी असलेले एन. के. पाटील २४ जून राेजी पालिका उपायुक्त म्हणून रुजू झाले हाेते. त्यांच्याकडे प्रथम सामान्य प्रशासन, भूमी मालमत्तासह इतर विभागांचा कारभार साेपविण्यात आला. काही दिवसांत सामान्य प्रशासन विभाग काढून अतिरिक्त आयुक्त विजय खाेराटे यांच्याकडे साेपविण्यात आला. गेल्या चार महिन्यात आयुक्त पी. शिवशंकर आणि उपायुक्त पाटील यांचे सूत जुळले नव्हते. ऑक्टाेबर महिन्यात आयुक्त कार्यालयातच दाेघांमध्ये वादाचा खटका उडाला. त्यानंतर ते वैद्यकीय रजेवर हाेते. मंगळवार, २ नाेव्हेंबर राेजी ते रुजू हाेणार हाेते. तत्पूर्वीच साेमवारी सायंकाळी आयुक्तांनी विविध मुद्यांच्या आधारे एन. के. पाटील यांना अकार्यक्षम ठरवून कार्यमुक्त केले. साेबत काेणत्या प्रकरणात अकार्यक्षम ठरले याचा उल्लेखही केला. हा प्रकार समजल्यानंतर पाटील संतप्त झाले हाेते.
आयुक्तांनी यापूर्वी शासनाकडून नियुक्त झालेले नगररचना कार्यालयाचे सहायक संचालक संजयकुमार माने यांना कार्यमुक्त केले हाेते. माने यांनी आपल्या आदेशाचे पालन करण्यास नकार दिल्याचा ठपका आयुक्तांनी ठेवला हाेता.
---
आयुक्तांनी सुरुवातीपासून माझ्याशी अरेरावी केली. वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या कामांसाठी मला जबाबदार धरण्याचा प्रयत्न झाला. माझा रक्तदाब वाढला. मी वैद्यकीय रजा काढून घरी हाेताे. या काळात खराेखरच रक्तदाब वाढला आहे की नाही याची खातरजमा म्हणून मला राेज व्हिडिओ काढून टाकायला सांगण्यात आले. हा अमानवी प्रकार मी काही दिवस सहन केला. मंगळवारपासून कामावर रुजू हाेणार हाेताे. यादरम्यान मला कार्यमुक्त केल्याचे सांगण्यात आले. याविरुध्द मी शासनाकडे दाद मागणार आहे. शासनाला घडला प्रकार कळविणार आहे.
-एन. के. पाटील, उपायुक्त, मनपा.