माध्यमिक शाळांच्या गुणवत्तेत वाढ करण्याची शिक्षण उपसंचालकांची सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:22 AM2021-03-17T04:22:38+5:302021-03-17T04:22:38+5:30
कुर्डूवाडी : कोरोनाच्या काळात विद्यार्थी हे शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात राहावेत म्हणून शिक्षकांची व मुख्याध्यापकांची जबाबदारी वाढली आहे. पालकांचा विश्वास ...
कुर्डूवाडी : कोरोनाच्या काळात विद्यार्थी हे शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात राहावेत म्हणून शिक्षकांची व मुख्याध्यापकांची जबाबदारी वाढली आहे. पालकांचा विश्वास संपादन करून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व सर्वांगीण शिक्षण देऊन गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन पुणे विभागाचे शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांनी कुर्डूवाडी येथील आयोजित कार्यशाळेत केले.
आदिशक्ती शिक्षण संस्था वेताळवाडी संचलित येथील आदर्श पब्लिक स्कूलच्या सभागृहात माढा तालुक्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांची गुणवत्तेविषयी आढावा बैठक व कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे बोलत होते. त्यांंनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या बैठकीला सोलापूर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक उपशिक्षणाधिकारी सुलभा वटारे, प्रशासन अधिकारी अनिल बनसोडे, गटशिक्षणाधिकारी मारुती फडके, आदर्श पब्लिक स्कूलचे अध्यक्ष अमोल सुरवसे उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना उपसंचालक उकिरडे यांनी माढा तालुक्यातून नामांकित शाळा नावारूपाला आणून क्रियाशील मुख्याध्यापक म्हणून कारकीर्दीचा ठसा उमठवण्याचे आवाहन केले. विद्यार्थी केंद्रित शिक्षण देऊन शालेय गुणवत्ता सुधारा. त्याचबरोबरच एन.टी.एस.स्कॉलरशिप यासारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये राज्याच्या गुणवत्ता यादीत आपले विद्यार्थी चमकावा, असेही आवाहन सर्व मुख्याध्यापकांना केले.
यावेळी उपशिक्षणाधिकारी सुलभा वटारे यांनी मुख्याध्यापकांना तंत्रस्नेही बना आणि प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचा व यावेळी पालकांच्या अडचणी समजून घ्या, अशा सूचना केल्या.
आदर्श पब्लिक स्कूलचे संस्थापक अमोल सुरवसे, संस्थेचे संचालक शिवाजी हावळे, प्रकल्प संचालिका पूजा सुरवसे यांच्यासह माढा तालुक्यातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.
................
१६ कुर्डूवाडी स्कूल
माढा तालुक्यातील सर्व माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांंना मार्गदर्शन करताना पुणे विभागाचे शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे.