विरोधकांना धारेवर धरले, पंढरपूरच्या कॉरिडॉरबाबत देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले !
By Appasaheb.patil | Published: December 12, 2022 12:21 PM2022-12-12T12:21:37+5:302022-12-12T12:23:02+5:30
आप्पासाहेब पाटील सोलापूर : पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात होणारा कॉरिडॉर हा कोणाला उद्ध्वस्त करणार नाही. कोणाचेही घरे ...
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात होणारा कॉरिडॉर हा कोणाला उद्ध्वस्त करणार नाही. कोणाचेही घरे तोडणार नाही. मंदिर परिसरातील मठ, मंदिर, परंपरा कायम ठेवणार आहोत. कोणीही कॉरिडॉरबाबत चुकीच्या अफवा पसरवू नये, यातून कोणाचेही नुकसान होणार नसल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
मध्यंतरी पंढरपुरातील अनेक लोकप्रतिनिधींनी आंदोलन, बंद पुकारून कॉरिडॉरला विरोध केला होता. शिवाय पंढरपुरातील अनेक लोकप्रतिनिधींनी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांचीही भेट घेतली होती. दरम्यान, देवेंद्र फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या कॉरिडॉरला विरोध जरी असला तरी हा कॉरिडॉर होणार असल्याचे फडणवीसांनी स्पष्टच सांगितले.
पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात ३०० कोटींचा कॉरिडॉर तयार करण्यात आला आहे. यातून रस्ते, मठ, पंढरपूर शहरातील गल्ल्या, घाट, लहान-मोठी मंदिरे, चंद्रभागा तीराचा विकास, विठ्ठल मंदिर ते पालखी मार्ग यावरील विकासाकडे कॉरिडॉर निर्माण करताना खास लक्ष देण्यात येणार आहे. मात्र मागील काही दिवसांपासून या कॉरिडॉरला स्थानिक लोकांकडून व विविध पक्षांकडून विरोध होताना दिसून येत आहे. आंदोलने, मोर्चे, निर्देशने होत आहेत. मात्र काहीही झाले तरी हा कॉरिडॉर होणारच आहे. यातून कोणाचेही नुकसान आम्ही करणार नसल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. सगळ्यांना सोबत घेऊन हे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचेही फडणवीसांनी शेवटी सांगितले. यामुळे विरोधकांना या वक्तव्यांचा चांगलाच झटका बसणार असल्याचे बोलले जात आहे.
पंतप्रधानाचेही शिक्कामोर्तब
पंढरपूर कॉरिडॉरला विरोध होत असतानाच रविवारी नागपूर येथील समृद्धी महामार्गाच्या कार्यक्रमात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पंढरपूरच्या कॉरिडॉरबाबत भाष्य केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या या कॉरिडॉरबाबत आता अंतिम निर्णय झाल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हा कॉरिडॉर होणार हे उपमुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर सिद्ध झाले.