धनराजने साखळी ओढली अन् रेल्वेचा अपघात टळला
By appasaheb.patil | Published: August 14, 2019 12:20 PM2019-08-14T12:20:31+5:302019-08-14T12:23:59+5:30
कुर्डूवाडी-दौंडदरम्यान घडली घटना; धनराजचे रेल्वे प्रशासनाकडून कौतुक व सन्मान
सोलापूर : कुर्डूवाडी ते दौंड रेल्वे स्थानकाचा परिसऱ़़ मध्यरात्रीची दीडची वेऴ़़ अचानक गाडीचे स्प्रिंग शॉकआॅब्सर्बर तुटल्याने डब्यावर जोरात दगड मारल्यासारखा आवाज आला...अशातच प्रसंगावधान राखून धनराज जैतकर याने गाडीची साखळी ओढली अन् पुढे जाऊन होणारा अपघात टळला.
या विषयी अधिक माहिती अशी की, धनराज हा आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी नातेवाईकांसोबत आला होता. दर्शन आटोपल्यानंतर या कुटुंबाने पंढरपूरहून रेल्वेने परतीचा प्रवास सुरू केला. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास गाडी जेव्हा कुर्डूवाडी ते दौंडदरम्यान धावत होती. त्यावेळी डब्यावर जोरात दगड मारल्यासारखा आवाज आला. गाडीचे स्प्रिंग शॉकआॅब्सर्बर तुटल्याने दगड उडत होते.
एक-दोन किलोमीटर गेल्यावर पुन्हा जोरात आवाज आला. रात्री दीड वाजले होते. त्यामुळे अनेक प्रवासी झोपी गेले होते. जे जागे होते त्यांनी साखळी ओढण्याची हिंमत केली नाही, मात्र धनराजने प्रसंगावधान दाखवत साखळी ओढली आणि गाडी थांबविली. गाडी थांबल्यानंतर रेल्वेच्या कर्मचाºयांनी तपासणी केली असता, गाडीचे पाटे (स्प्रिंग) तुटल्याचे लक्षात आले. त्यानंतर कर्मचाºयांनी तत्काळ याची दुरुस्ती केली. त्यानंतर पुढचा प्रवास सुरू झाला.
पाच हजारांचे बक्षीस...
- धनराजच्या सतर्कतेमुळे रेल्वेचा अपघात टळला. यामुळे अनेक प्रवाशांचे प्राण वाचले. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने धनराजच्या कार्याचे कौतुक केले. सोलापूर रेल्वे विभागाचे व्यवस्थापक हितेंद्र मल्होत्रा यांच्या हस्ते धनराज जैतकर याचा ५ हजार रुपये रोख आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी रेल्वेचे अपर विभागीय व्यवस्थापक व्ही. के. नागर व रेल्वेचे कर्मचारी उपस्थित होते.