पंढरपूर/सोलापूर : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी पुढे आली असून, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी सावध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. या जागेवर लवकरच पोटनिवडणूक होणार आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नुकतेच सरकोली येथे येऊन भालके कुटुंबीयांचे सांत्वन केले होते. त्यावेळी काही कार्यकर्त्यांकडून भारत भालके यांचे पुत्र भगिरथ यांची उमेदवारी जाहीर करावी, अशी मागणी केली होती. त्यावर पवारांनी भाष्य केले नव्हते.
आता पार्थ पवार यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू झाली आहे. पंढरपुरातील अमरजीत पाटील यांनी पवारांना पत्रही पाठविले. आमदार रोहित पवार म्हणाले, कुणी मागणी केली, म्हणून लगेच पूर्ण होईल असे नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही उमेदवारीचा निर्णय अद्याप झालेला नाही, असे म्हटले आहे.