सोलापूर : अंदाजपत्रकाच्या तयारीसाठी सभागृह नेत्यांनी आयोजित केलेल्या बैठकीत सत्ताधारी भाजपच्या अनेक नगरसेवकांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. अडीच वर्षांपासून नगरसेवकांना विकास निधी नाही. यंदा विकास निधी देणे जमत नसेल तर अंदाजपत्रक मांडू नका. महापालिका बरखास्तीची शिफारस करा, अशी मागणी केली.
गेल्या तीन महिन्यांपासून मनपाचे २०१९-२० चे अंदाजपत्रक लटकले होते. आता पदाधिकाºयांनी २७ जूनची तारीख निश्चित केली आहे. अंदाजपत्रकाच्या तयारीसाठी सभागृह नेत्यांच्या कार्यालयात गुरुवारी सकाळी बैठक आयोजित करण्यात आली होती.
महापौर शोभा बनशेट्टी, महापालिका आयुक्त दीपक तावरे, उपमहापौर शशिकला बत्तुल, सभागृह नेते संजय कोळी, अतिरिक्त आयुक्त श्रीकांत मायकलवार, उपायुक्त त्रिंबक ढेंगळे-पाटील उपस्थित होते. करवसुलीत प्रशासनाने सुमार कामगिरी केली. याबद्दल नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. प्रशासनाने मांडलेले अंदाजपत्रक चुकीचे आहे. अखेर शिल्लक दाखविली असून तुटीचे अंदाजपत्रक सादर केले आहे. त्यामुळे महापालिका बरखास्तीची शिफारस करा, अशी मागणी ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांनी केली. काँग्रेस कार्यकाळात नगरसेवकांना १२ कोटी रुपयांपर्यंत निधी मिळाला होता.
पण भाजपची सत्ता येऊन अडीच वर्षे झाली तरी सर्व नगरसेवकांना एक रुपयाचा निधी मिळालेला नाही. उत्पन्न वाढीसाठी प्रशासनाने प्रयत्न करायला हवेत. लाख रुपये पगार घेणारे अधिकारी निवांत आहेत. पण नगरसेवकांना सामान्य माणसांना तोंड द्यावे लागते. निवडून आल्याची लाज वाटते, असेही त्यांनी सांगितले. सभागृह नेते संजय कोळी यांनीही नगरसेवकांना निधी देण्याची मागणी केली.
आयुक्त प्रथम नाही म्हणाले, नंतर हो म्हणाले...- नगरसेवकांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर मनपा आयुक्त दीपक तावरे यांनी महापालिकेच्या आर्थिक परिस्थितीची माहिती दिली. यंदा निधी देता येणार नाही, असे स्पष्ट केले. त्यावर सर्वच नगरसेवक आक्रमक झाले. निधी देतो असे सांगूनच इथून उठा, अशी आग्रही मागणी केली. त्यावर आयुक्तांनी थोडेफार देण्याचा प्रयत्न करेन, पण आकडा सांगणार नाही, असे स्पष्टीकरण दिले.
बैठकीला या हो... सभागृह नेत्याचे आवाहन- अंदाजपत्रकाच्या तयारीसाठी बोलावलेल्या बैठकीला ५० पैकी २१ नगरसेवक उपस्थित होते. अनेक नगरसेवकांना निरोप देऊनही त्यांनी येण्यास नकार दिला. नको ती बैठक, तिथे जाऊन काहीच उपयोग नाही, असेही नगरसेवकांनी सांगितले. सलग दुसºया बैठकीला अनुपस्थित राहिलेल्या नगरसेवकांना सभागृह नेते संजय कोळी यांनी गुरुवारी सायंकाळी स्मरणपत्रे पाठविली आहेत.
आमच्या पदाधिकाºयांनी एकाही नगरसेवकाला मदत दिलेली नाही. हद्दवाढ भागातील कामांना निधी मिळालेला नाही. मग बजेट मिटिंगला जाऊन काय उपयोग? बजेट मिटिंगमधून काही हाती लागणार नाही. त्यामुळे आम्ही बजेट मिटिंगला जाणार नाही. निधी देणार नसतील तर यांनी मनपा बरखास्त केली पाहिजे. -राजेश काळे, नगरसेवक, भाजप.