स्थायीची बैठक पुढे ढकलण्याची नामुष्की
By admin | Published: June 25, 2014 01:26 AM2014-06-25T01:26:36+5:302014-06-25T01:26:36+5:30
जिल्हा परिषद : सीईओसह आठ अधिकारी अनुपस्थित
सोलापूर: लोकसभा व पदवीधर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर मंगळवारी आयोजित केलेल्या स्थायीच्या बैठकीला अधिकारी नसल्याने बैठक पुढे ढकलण्याची नामुष्की जिल्हा परिषदेवर आली.
२९ मार्च रोजी जिल्हा परिषद स्थायीची बैठक तहकूब करण्यात आली होती. ५ एप्रिलपासून लोकसभा निवडणूक जाहीर झाल्याने आचारसंहितेचा अंमल सुरू झाला. २९ मार्चची तहकूब बैठक स्थायीची बैठक २८ एप्रिल रोजी झाली, परंतु आचारसंहितेमुळे ती गुंडाळावी लागली. त्यानंतर २६ मे रोजी बैठकही आचारसंहितेच्या सावटाखाली झाली. मंगळवार दिनांक २३ जून रोजी ही बैठक आयोजित केली होती. या बैठकीला सीईओ, अतिरिक्त सीईओ, तीनही उपमुख्य कार्यकारी अधिकारी, प्रकल्प संचालक, समाजकल्याण अधिकारी व पाणीपुरवठ्याचे कार्यकारी अभियंता नसल्याने तहकूब करण्याची नामुष्की अध्यक्षांवर आली. २३ रोजी तहकूब केलेली बैठक लगेचच बुधवारी घेण्याचे अगोदर ठरले काही वेळेनंतर बुधवारची स्थायी बैठक रद्द करुन गुरुवार दिनांक २६ रोजी घेण्याचा निर्णय झाला.
--------------------
धुसफुस सुरू
उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी कामे वाटपासंदर्भात एक पत्रक प्रसिद्धीला दिले होते. त्याबाबत विचारणा केल्यानंतर अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी यांनी मी माझ्यापुरते पाहते, मला बाकीच्याचे माहीत नाही असे सांगितले. इकडे बांधकाममधील एका टेबलच्या वाटणीवरुन पदाधिकाऱ्यांमध्ये चांगलीच जुंपली होती.