सोलापूर : जून ते ऑक्टोबरदरम्यान सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीपोटी राज्य सरकारने पहिल्या टप्प्यात सोलापूर जिल्ह्याला २९४ कोटी ८१ लाखांचा मदतनिधी ९ नोव्हेंबर रोजी दिला आहे. जिल्ह्यातील जवळपास पाच लाख पूरग्रस्त शेतकऱ्यांची यादी बँक खातेनिहाय तयार आहे. मदतनिधी लवकरात लवकर वाटप करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने मंगळवारी सायंकाळी काढले आहेत. सर्व तहसीलदारांना या संबंधीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गुरुवार, दि. १२ नोव्हेंबरपासून मदतनिधी वाटपाला सुरुवात होणार आहे. पूरग्रस्त शेतकऱ्यांची यादी संबंधित बँकांकडे सुपूर्द करण्यात येईल. बँकांच्या प्राथमिक तपासणीनंतर बँकेच्या प्रशासनाकडून संबंधित खातेदारांच्या खात्यात पैसे शनिवारपर्यंत जमा होतील.
अतिवृष्टी झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून तालुकानिहाय शेतकऱ्यांच्या नुकसानीत पिकांचे पंचनामे युद्धपातळीवर झाले. पंचनामे करताना संबंधित पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यांची डिटेल माहिती, आधार क्रमांक, बँकेचा पासबुक तसेच इतर तपशील देखील घेण्यात आला. त्यामुळे आता मदतनिधी वाटप करताना फारशी अडचण येणार नाही, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. शेतीपिकांच्या नुकसानीकरिता २५० कोटींचा मदतनिधी जिल्हा प्रशासनाकडे जमा झाला आहे. दिवाळीच्या पूर्वसंध्येला सोलापूर जिल्ह्याला पहिल्या टप्प्यात २५० कोटींची मदत पूरग्रस्तांना मिळाल्याने पूरग्रस्तांची दिवाळी गोड होणार आहे. जिरायत-बागायत बाधित क्षेत्राकरिता प्रतिहेक्टर १० हजार तसेच बहुवार्षिक पिकांकरिता प्रतिहेक्टरकरिता २५ हजारांची मदत राज्य सरकारने अध्यादेशाद्वारे जाहीर केली आहे. एकूण सोलापूर जिल्ह्यातील पिकांच्या नुकसानीकरिता २५० कोटी, मनुष्यहानी, पूर्णत: घर उद्ध्वस्त, कपडे-भांडी व इतर नुकसानीकरिता १३ कोटी ४४ लाख रुपये, मृत जनावरांकरिता तीन कोटी ३ लाख रुपये आणि पक्क्या घरांच्या झालेल्या नुकसानीबाबत ७ कोटी पाच लाख रुपयांची मदत राज्य सरकारने सोलापूर जिल्ह्याला दिली आहे.