हुशार बायको नको रे बाबा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 12:25 PM2019-03-04T12:25:39+5:302019-03-04T12:26:04+5:30

मागील सोमवारच्या ‘दुनियादारी’ मध्ये ‘(अति) हुशार नवरा नको गं बाई!’ हा लेख वाचून अनेक वाचकांचे फोन आले. आपल्या ‘लोकमत’चा ...

Do not be intelligent wife! | हुशार बायको नको रे बाबा !

हुशार बायको नको रे बाबा !

googlenewsNext

मागील सोमवारच्या ‘दुनियादारी’ मध्ये ‘(अति) हुशार नवरा नको गं बाई!’ हा लेख वाचून अनेक वाचकांचे फोन आले. आपल्या ‘लोकमत’चा वाचक वर्ग अत्यंत चोखंदळ आहे. एका प्राध्यापिकेने फोन केला. त्या म्हणाल्या, वकीलसाहेब, बहुतेक त्या मुलीच्या आई-वडिलांनी पत्रिका न बघताच तिचे लग्न लावले असेल. मी त्यांना म्हणालो, तुम्ही एवढ्या सुशिक्षित आहात. तरी देखील तुमचा पत्रिका बघून लग्न करण्यावर विश्वास आहे ? त्या म्हणाल्या, अर्थातच. मी त्यांना म्हणालो, पत्रिका बघून लग्न लावलेल्या कित्येक नवरा-बायकोंचा संसार काही महिन्यातच मोडून पडलेला मी बघितला आहे.

सोलापूर-पुणे रेल्वे प्रवासात योगायोगाने शेजारी बसलेल्या तरुण-तरुणीची ओळख होऊन झालेल्या आंतरजातीय प्रेम विवाहातील पती-पत्नी सुखाने संसार करीत आहेत. तर अनेक ज्योतिष तज्ज्ञाकडून पत्रिका तपासून अत्यंत धार्मिक  वातावरणात, थाटामाटात करण्यात आलेले लग्न काही दिवसातच वादळात सापडलेले मी बघितले आहे. फल ज्योतिष्याला कोणताही शास्त्रीय पाया नाही. पत्रिकेचे छत्तीस गुण जमणाºया तरुण पोरीच्या कपाळी वैधव्य आलेले मी बघितले आहे. तर पत्रिका अजिबात न बघता केलेले विवाह यशस्वी झालेले आहेत हे देखील बघितलेले आहे. एक वाचक  मिश्कीलपणे म्हणाला, अति हुशार नवरा नको गं बाई तसे आता अति हुशार बायको नको रे बाबा असा एखादा खटला नाही का ?  मी म्हणालो, पुढच्या सोमवारी वाचा. 

तो आॅफिसला आला. त्याच्या हातात कोर्टाची कागदपत्रे होती. अधिकारी असलेल्या त्याच्या पत्नीने न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केलेला होता. नवरा शारीरिक व मानसिक छळ करतो, हुंड्यासाठी जाचहाट करतो असा तिचा आरोप होता. मी त्यास त्याबद्दल विचारले. त्यावेळी तो म्हणाला, यातील शब्द ना शब्द खोटा आहे. मी कधीही तिचा मानसिक अगर शारीरिक छळ केलेला नाही.

एक पैसादेखील मागितला नाही. उलट, मीच तिच्यावर कर्ज काढून हजारो रुपये खर्च केलेले आहेत. त्याचे म्हणणे ऐकून मी स्तब्ध झालो.  मी म्हणालो, मग खरे काय आहे?  तो सांगू लागला, तो सर्वसामान्य घरातील, परंतु कष्टाळू. त्याची आई देखील अत्यंत कष्टाळू. ‘कमवा व शिका’ या योजनेखाली त्याचे महाविद्यालयीन शिक्षण झाले होते. शिक्षणानंतर नोकरी लागली. पगार फार नव्हता. गरीब घरातील पण हुशार मुलीबरोबर त्याचे लग्न झाले. लग्नाच्यावेळी ती सातवी शिकलेली होती. तिची हुशारी पाहून लग्नानंतर त्याने तिला पुढील शिक्षणासाठी शाळेत घातले. एस. एस. सी. परीक्षेला ती प्रथम श्रेणीत आली.  त्यानंतर तिला कॉलेजमध्ये घातले. हुशार असल्याने पदवी परीक्षेत देखील ती प्रथम श्रेणीत आली. स्पर्धा परीक्षा पास होऊन अधिकारी होण्याची इच्छाही तिने बोलून दाखवली. तो तिला घेऊन पुण्याला राहू लागला. पडेल ती कामे करीत होता.  

प्रसंगी पैसे उसने घेऊन त्याने तिची फी भरली. स्पर्धा परीक्षेत तिने यश मिळविले. तिला ‘क्लासवन’ची नोकरी लागली. नोकरीच्या जागी ती रुजू झाली. एका वर्षातच ती त्याच्याबरोबर तुसडेपणाने वागू लागली. कोणत्याही सार्वजनिक समारंभास त्याला बरोबर नेत नव्हती. एवढे कशाला, घरी काही समारंभ असेल तर त्याला तुम्ही सिनेमाला जा, चार-पाच तास येऊ नका असे स्पष्टपणे सांगून त्याचा अपमान करु लागली. अपमान गिळून तो तेथेच राहात होता. तिला आता त्याची लाज वाटत होती. तिने त्याला तुम्ही गावाकडे जाऊन राहा असे सांगून गावाकडे पाठवले आणि घटस्फोटाचा खटला दाखल केला. 

मी त्यास सांगितले, बाबा, असल्या बायकोबरोबर भांडण करण्यास काही अर्थ नाही. तू तिला चांगल्या हेतूने शिकविले, मोठे केलेस, उपकाराची फेड तिने अपकाराने केली. परमेश्वर तिला योग्य शिक्षा देईल. त्याने माझे ऐकले. त्या खटल्यात आम्ही हजर देखील झालो नाही. तिला एकतर्फी घटस्फोट मिळाला. घटस्फोट मिळाल्यानंतर तो भेटण्यास आला. मी त्यास म्हणालो, तुला हे पडलेले वाईट स्वप्न आहे असे समजून नव्या उमेदीने पुढचे आयुष्य चालू ठेव. पुन्हा लग्न कर. सुखाने संसार कर. तो म्हणाला, आबासाहेब, मी निश्चितच आता लग्न करणार आहे. पण हुशार मुलीशी नाही. हुशार बायको नको रे बाबा! असे पुटपुटतच त्याने आॅफिस सोडले.  
-अ‍ॅड. धनंजय माने    
(लेखक ज्येष्ठ विधिज्ञ आहेत)

Web Title: Do not be intelligent wife!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.