चंद्रग्रहण पाळू नका, वटपूजन करता येईल; सुतक पाळ्ण्याचीही गरज नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2020 12:05 PM2020-06-04T12:05:50+5:302020-06-04T12:08:29+5:30
पंचांगकर्ते मोहन दाते यांचे आवाहन; नेहमीप्रमाणे सर्व व्यवहार, पूजा, अर्चा, कुळधर्म, कुलाचार करावेत
सोलापूर : ज्येष्ठ पौर्णिमेस शुक्रवारी ५ जूनला चंद्रग्रहण आहे. हे ग्रहण ‘छायाकल्प’ ग्रहण असल्याने या ग्रहणाचे वेध व इतर कोणतेही नियम कोणीही पाळू नयेत. त्यामुळे नेहमीप्रमाणे सर्व व्यवहार, पूजा, अर्चा, कुळधर्म, कुलाचार करावेत, तसेच यावर्षी कोरोनामुळे प्रत्यक्ष वडाचे पूजन करणे शक्य होणार नाही, म्हणून वडाचे चित्र काढून घरात वटपूजन करावे. तेव्हा नेहमीप्रमाणे ५ जूनला शुक्रवारी माध्यान्हपर्यंत (दुपारी दीड वाजेपर्यंत) कोणत्याही वेळी घरी वटपूजन करावे, असे आवाहन पंचांगकर्ते मोहन दाते यांनी केले.
५ जूनला असणारं चंद्रग्रहण तब्बल ३ तास १८ मिनिटांचं आहे. हे एक पेनुमब्रल चंद्रग्रहण असेल, म्हणजे याचा अर्थ चंद्र पृथ्वीच्या सावलीच्या अस्पष्ट भागावरून प्रवास करीत आहे. हे चंद्रग्रहण ५ जूनला रात्री ११.१५ मिनिटांनी सुरू होईल. रात्री १२.५४ मिनिटांनी याचा सर्वाधिक परिणाम बघितला जाईल आणि ६ जूनला २.३४ मिनिटांनी ग्रहण संपेल. एक उपछाया चंद्रग्रहण असल्यामुळे याचं सुतक पाळण्याची गरज नाही.
जून महिना खगोलप्रेमींसाठी खूप खास असणार आहे. कारण या महिन्यात चंद्र आणि सूर्य दोन्ही ग्रहणे नागरिकांना बघता येणार आहेत. यातील पहिलं ग्रहण येत्या ५ जूनला आहे, हे चंद्रग्रहण आहे. तर दुसरं सूर्यग्रहण असून ते येत्या २१ जूनला दिसणार आहे. जून महिन्यातील ही दोन्ही ग्रहणे भारतात दिसणार आहेत. पाच जूनला येणारं चंद्रग्रहण भारतासोबतच युरोप, आफ्रिका, आशिया आणि आॅस्ट्रेलियामध्येही दिसणार आहे. तर २१ जूनला होणारं सूर्यग्रहण भारत, दक्षिण-पूर्व युरोप आणि आशियामध्ये दिसणार आहे. सध्या राहू आणि केतूशिवाय शनी, गुरू, शुक्र आणि प्लुटो हे चार ग्रह वक्री चालत आहेत. हे चंद्रग्रहण वृश्चिक राशीवर पडणार असल्याचेही सांगण्यात आले.
या वर्षातील चंद्रग्रहणाविषयी अशी आहे माहिती...
- २०२० या सालात एकूण चार चंद्रग्रहणे आहेत. ही जगाच्या वेगवेगळ्या भागात दिसतील. २०२० चे पहिले चंद्रग्रण १०-११ जानेवारीला झाले. वर्षाचे दुसरे चंद्रग्रहण ५ जूनला आहे. हे ग्रहण रात्री ११ वाजून १६ मिनिटांनी सुरू होईल आणि ६ जूनच्या सकाळी २ वाजून ३४ मिनिटांनी संपेल. हे ग्रहण वृश्चिक राशी आणि ज्येष्ठ नक्षत्रात दिसणार आहे. २०२० मधील तिसरे चंद्रग्रहण ५ जुलैला रविवारी असेल. हे चंद्रग्रहण सकाळी ८ वाजून ३८ मिनिटांनी प्रारंभ होईल आणि ११ वाजून २१ मिनिटांपर्यंत चालेल. हे ग्रहण दिवसा असल्याने रात्री दिसणार नाही. हे ग्रहण पौर्णिमेच्या दिवशी धनू राशीत असेल. या वर्षाचे अखेरचे चंद्रग्रहण ३० नोव्हेंबरला दुपारी १ वाजून ३४ मिनिटांनी असेल, ते ५ वाजून २२ मिनिटांनी संपेल. हे ग्रहण दिवसा असल्याने भारतात दिसू शकणार नाही. हे ग्रहण रोहिणी नक्षत्र आणि वृषभ राशीत असणार आहे.