सोलापूर : ग्रामीण भागातील जनता पाणीटंचाई, जनावरांचा चारा आणि रोहयोच्या कामासाठी आक्रोश करीत असताना अधिकाºयांनी बंद खोलीत बसून दुष्काळाचे नियोजन करणे अयोग्य आहे. गावात जा, जागेवर जाऊन माहिती घ्या, ग्रामस्थांशी बोला मग नियोजन करा, असे सक्त आदेश सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी अधिकाºयांना दिले.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील लोकप्रतिनिधी आणि अधिकाºयांच्या उपस्थितीत टंचाई आराखडा नियोजन बैठकीत सहकारमंत्री बोलत होते. व्यासपीठावर निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, प्रांताधिकारी ज्योती पाटील, तहसीलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड, भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, सभापती सोनाली कडते, उपसभापती संदीप टेळे, बाजार समितीचे संचालक आप्पासाहेब पाटील-वडकबाळकर, रामप्पा चिवडशेट्टी, श्रीमंत बंडगर यांची प्रमुख उपस्थिती होती.
मंद्रुप, आहेरवाडी, रामपूर येथे पाणी टंचाई असून नव्याने टँकर देण्याची तसेच खेपा वाढवण्याची मागणी करण्यात आली. टँकर मागणीच्या प्रस्तावाला प्रशासन प्रतिसाद देत नाही. काही गावांना अर्धा टँकर पाणीपुरवठा होतो तोही एखादीच खेप. त्यांच्यावर कोणाचेच नियंत्रण नाही. तलाठी गावात येत नाहीत अशा तक्रारी लोकप्रतिनिधींनी करताच सहकारमंत्री काहीसे संतप्त झाले. त्यांनी अधिकाºयांना धारेवर धरले.
आठ दिवसात अहवाल सादर करा, असे आदेश त्यांनी दिले. चारा छावण्या सुरु करण्यासाठी सेवाभावी संस्थांनी पुढाकार घेण्याचे आवाहन सहकारमंत्र्यांनी केले. तालुक्यात एकही संस्था पुढे येत नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. कंदलगावचे शरीफ शेख यांनी चारा छावण्या सुरू होत नसतील तर जनावरांची गणती करून शेतकºयांच्या खात्यावर अनुदान जमा करण्याची मागणी केली. चारा डेपो सुरू करण्याचा प्रस्ताव पुढे आला तरच प्रस्तावांना दोन दिवसात मंजुरी देण्यात येईल, असे आश्वासन निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांनी दिले.
बैठकीला डॉ.सी.जी. हविनाळे, हणमंत कुलकर्णी, एम.डी. कमळे, शशिकांत दुपारगुडे, भारत बिराजदार, नागण्णा बनसोडे यांच्यासह तालुक्यातील सरपंच-ग्रामसेवक, शासकीय कर्मचारी उपस्थित होते.
अनुपस्थित तलाठ्याच्या निलंबनाचे आदेश- आहेरवाडीचे तलाठी गावात येत नाहीत, अशी तक्रार ग्रामस्थांनी केली. बैठकीलाही ते उपस्थित नव्हते त्यांना तातडीने निलंबित करण्याचे आदेश सहकारमंत्र्यांनी दिले.- पावसाळा येईपर्यंत ग्रामसेवक आणि तलाठ्यांना मुख्यालयात मुक्काम करणे सक्तीचे आहे. त्यात हयगय झाल्यास कठोर कारवाई करू, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांनी दिल्या.