मतदानानंतर महाविकास आघाडी प्रतिस्पर्धी शेकाप आघाडी, पॅनल यांच्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते, उमेदवार आपापल्या प्रभागातील मतांची आकडेवारी जुळवून त्याचा अंदाज घेताना दिसत आहेत, तर प्रतिस्पर्धी उमेदवार कसा पराभूत होणार हेही पटवून सांगत आहेत. आपल्याच पॅनलची सत्ता येणार म्हणून हजारो ते लाखो रुपयाच्या पैजा लावण्यात आल्या आहेत. असे असले तरी उमेदवारही विजयासाठी देव पाण्यात ठेवून बसले आहेत. अनेक उमेदवारांनी विजय आपलाच होणार असल्याचा अंदाज वर्तविला असला तरी जनतेने विजयाचा गुलाल उधळण्याची संधी कोणाला मिळणार हेही आज स्पष्ट होणार आहे.
एकालाच मिळणार गुलाल उधळण्याची संधी
गावगाड्यात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सर्वच पक्षांचे नेतेमंडळी, पॅनलप्रमुख, उमेदवार, समर्थकांनी जीवाचे रान करून प्रचार यंत्रणा राबवली. ग्रामपंचायतीवर अपल्याच गटाची सत्ता प्रस्थापित करण्यासाठी इर्षेने तिजोरी मोकळी करून सढळ हाताने मतांची गोळाबेरीज केली. गावकऱ्यांनी कोणाला सत्ताधारी केले तर कोणाला सत्तेपासून दूर ठेवले जाणार हेही अवघ्या काही तासांत स्पष्ट होणार आहे. मात्र दोन्ही गटाचे कार्यकर्ते विजयाचा दावा करत असले तर एकालाच विजयाचा गुलाल उधळण्याची संधी मिळणार, हे मात्र निश्चित.