थकबाकीमुळे एक हजार पाणीपुरवठा योजनांचा अन् दीड हजार पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडित
By Appasaheb.patil | Published: June 29, 2021 12:52 PM2021-06-29T12:52:36+5:302021-06-29T12:53:15+5:30
महावितरणची वीजबिल वसुली मोहीम वेगात - गावागावात अंधाराचे साम्राज्य - अनेक गावांना करावा लागणार पाणीटंचाईचा सामना
आप्पासाहेब पाटील
सोलापूर - वारंवार सांगूनही वीजबिल न भरलेल्या जिल्ह्यातील १ हजार ७ पाणीपुरवठा वर्गवारीतील योजनांचा तर १ हजार १४३ पथदिव्यांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. थकबाकी असल्याने जिल्ह्यातील २५ हजार ८४२ ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आल्याची माहिती महावितरण प्रशासनाने दिली.
सोलापूर जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटामुळे मध्यंतरी वीज देयक वसुलीला ‘ब्रेक’ लागला होता. त्यामुळे घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, पाणीपुरवठा, पथदिवे यासह इतर वर्गवारीतील वीज वापर करणाऱ्या ग्राहकांकडे २८ जून अखेर ५१६३.०९ कोटी रुपयांची थकबाकी आहे. कोरोनाचे संसर्गाचे संकट ओसरू लागताच महावितरणनेही वीज देयक वसुलीची धडक मोहीम हाती घेतली आहे. वीजबिल न भरणाऱ्या ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात येत आहे. यासाठी महावितरण प्रशासनाने विविध पथके तैनात केली आहेत. या पथकात वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. ग्राहकांच्या सोयीसाठी सुट्टीच्या दिवशीही महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्रे सुरू ठेवली आहेत.
-----------
अशी आहे वर्गवारीनुसार ग्राहक संख्या अन् थकबाकी (कोटीत)
वर्गवारी थकीत ग्राहक थकीत रक्कम (कोटीत)
- घरगुती - ३,८३,३६५ - १२७.१७
- व्यापारी - ३८,५४४ - २५.४०
- औद्योगिक - ८,८९६ - १४.३३
- सार्वजनिक सेवा - २,६९४ - २.८५
- पाणीपुरवठा - २,११० - ७२.४४
- पथदिवे - ५,३६१ - ४४६.९८
- शेती - ३,६१,०२६ - ४४७२.९२
- इतर - २७६ - १.००
- एकूण - ८०२२७२ - ५१६३.०९
-------------
५००० पेक्षा जास्त थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित
माहे-जून २०२१ मध्ये वीजबिल मोहिमेतंर्गत सोलापूर जिल्ह्यातील घरगुती, व्यापारी व औद्योगिक वर्गवारीतील ५ हजार रूपये पेक्षा जास्त थकबाकी असणाऱ्या २५ हजार ८४२ ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. ५९ हजार ८९६ ग्राहकांकडून ४०. ३० कोटी थकबाकी वसूल करण्यात आली आहे.
--------------
विद्युत पुरवठा खंडितची मोहीम वेगात
पाणीपुरवठा योजनेतील १ हजार ७ पाणीपुरवठा योजनेचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. एकूण २ हजार ११० ग्राहकांकडे ७२.४४ काेटी रूपयांची थकबाकी आहे. ८५ ग्राहकांकडून ०.२९ लाख इतकी रक्कम वसूल करण्यात आली. उर्वरित ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित करण्याची कार्यवाही सुरू आहे.
सध्या सोलापूर जिल्ह्यात वीजबिल वसुलीची मोहीम वेगात सुरू आहे. ५ हजारापेक्षा जास्त थकबाकीदारांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात येत आहे. ग्राहकांनी वीजबिल भरून कारवाईच्या मोहिमेपासून दूर रहावे. आतापर्यंत २५ हजार ८४२ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
- ज्ञानदेव पडळकर,
अधीक्षक अभियंता, सोलापूर मंडल, महावितरण.