अरूण बारसकर सोलापूर : साखर कारखाने, दूध संघ, सूत गिरणी, सहकारी बँका, जिल्हा बँका तसेच विकास सोसायट्यांच्या संचालकांना मार्च २०१९ पासून मुदतवाढ मिळत आहे. येत्या मार्चपर्यंत संचालक मंडळाला मुदतवाढ मिळाल्याने ६४ हजार ३५३ संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. आता मार्चनंतर सहकार क्षेत्रात निवडणुकीचा धडाका उडणार की, आणखीन मुदतवाढ मिळणार, याकडे लक्ष लागले आहे.
राज्यात नव्याने काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली. कर्जमुक्तीची अंमलबजावणी सुरू असल्याने मुदत संपलेल्या सहकारी संस्थांच्या संचालक मंडळाला मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्यामुळे मार्च २०१९पर्यंत व त्यानंतर मुदत संपलेल्या संस्थांच्या निवडणुका होऊ शकल्या नाहीत. मार्च २०२०मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर पुन्हा मुदत संपलेल्या सर्वच संस्थांच्या संचालक मंडळाला मुदतवाढ मिळाली होती. त्यानंतर दर तीन महिन्यांनी स्वतंत्र आदेश काढून सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या.
जानेवारी २०२१ महिन्यापासून निवडणुकीचा धडाका सुरू होईल, असे सांगण्यात येत असताना १६ जानेवारी रोजी आदेश काढून मार्च २०२१पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यामध्ये साखर कारखाने, सूत गिरण्या, दूध संघ, गृहनिर्माण संस्था, सहकारी बँका, जिल्हा बँका, विकास सोसायट्या, पतसंस्था व इतर ६४ हजार ३५३ सहकारी संस्थांचा समावेश आहे.
२० जिल्हा बँकांनाही मुदतवाढराज्यातील २० जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या संचालक मंडळाची मुदत संपल्याने मुदतवाढ मिळत आहे. गडचिरोली जिल्हा बँक, पुणे जिल्हा बँक, औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक, बीड जिल्हा बँक, लातूर जिल्हा बँक, अकोला जिल्हा बँक, परभणी जिल्हा बँक, मुंबई जिल्हा बँक, नांदेड जिल्हा बँक, जळगाव जिल्हा बँक, रत्नागिरी जिल्हा बँक, धुळे व नंदुरबार जिल्हा बँक, अहमदनगर मध्यवर्ती बँक, ठाणे जिल्हा बँक, सिंधुदुर्ग जिल्हा बँक, उस्मानाबाद जिल्हा बँक, सातारा जिल्हा बँक, नाशिक मध्यवर्ती, सांगली व कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांचा समावेश आहे.
सोलापूरचे सहा कारखाने सोलापूर जिल्ह्यातील श्री. संत दामाजी मंगळवेढा, श्री. विठ्ठल गुरसाळे, श्री. पांडुरंग श्रीपूर, विठ्ठलराव शिंदे पिंपळनेर, श्री. संत कुर्मदास माढा व भीमा सहकारी टाकळी सिकंदर या साखर कारखान्यांच्या संचालक मंडळाची मुदत संपत असल्याने निवडणुकीला पात्र आहेत.
पश्चिम महाराष्ट्रातील बारा दूध संघ दूध व्यवसायात अग्रेसर असलेले पश्चिम महाराष्ट्रातील १२ सहकारी दूध संघ निवडणुकीला पात्र आहेत. त्यामध्ये कोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ), पुणे जिल्हा दूध संघ (कात्रज), सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघ (दूधपंढरी), वसंतदादा पाटील जिल्हा दूध संघ, तासगाव, राजारामबापू पाटील तालुका दूध संघ, इस्लामपूर, शेतकरी कवठे महांकाळ दूध संघ, मोहनराव शिंदे दूध संघ, मिरज, पाटण तालुका दूध संघ, फलटण तालुका दूध संघ, सातारा तालुका दूध संघ, लोकनेते हणुमंतराव पाटील दूध संघ, विटा व खंडाळा तालुका दूध संघ यांचा समावेश आहे.