- राजकुमार सारोळेसोलापूर : जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा मोठ्या प्रमाणावर बसू लागल्या आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्यातील बंकलगी येथे यंदा पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष्य आहे. गावात पाण्याची सोय नसल्याने यंदा एकही लग्न झाले नाही. दरवर्षी गावातील शाळेत दहा ते पंधरा लग्ने होतात. लग्नासाठी आता सोलापूर शहराकडे धाव घ्यावी लागत आहे.शहरापासून २५ किलोमीटर अंतरावरील दक्षिण सोलापुरातील बंकलगी गावात गेल्यानंतर पाणी आणणाऱ्या मुलांनी सांगितले की, आमच्या गावात पाणी नाही, शेजारच्या म्हणजे आहेरवाडी गावातून पाणी आणावे लागतेय. सरकारी टँकर येतो का, असे विचारल्यावर मुले म्हणाली, कधीतरी येतो, पण खासगी टँकरवाले एक पिंप भरून द्यायला शंभर ते दोनशे रुपये मागतात, त्यापेक्षा आम्हीच सायकलवरून पाणी आणतो.गावातील नागरिक लक्ष्मीपुत्र बिराजदार म्हणाले, इथे ९६ प्लॉट झोपडपट्टी आहे. गावात फक्त तीनच ठिकाणी पाणी मिळते. या झोपडपट्टीत मल्लिकार्जुन भालगाव यांनी मारलेल्या बोअरमधून दर तासाला आठ ते दहा घागरी पाणी मिळते. यासाठी परिसरातील महिला सकाळपासूनच रांगा लावतात. शरण्णप्पा मोटे म्हणाले, गावची पाणीपुरवठा योजना दोन वर्षांपासून बंद आहे. ग्रामपंचायतीने पाणी पुरवठ्यासाठी तीन विहिरी घेतल्या, पण त्या कोरड्या आहेत. त्यामुळे एकतर आहेरवाडी किंवा सुलेरजवळगे येथील बोअरवरून पाणी आणावे लागते असे सांगितले. रेवप्पा कोरे यांना विहिरीच्या पायºया चढून वर आल्यावर त्यांना दम लागला होता. पाणी गढूळ होते तरीही गाळून प्यावे लागते, असे त्यांनी सांगितले.जुन्या आडात टँकरने ओतले पाणीबंकलगी गावात ग्रामपंचायतशेजारी असलेल्या जुन्या आडातून लोकांना पाण्याची सोय करण्यात आली आहे. हा आड आटला आहे. तक्रार केल्यावर रविवारी तीन टँकर पाणी ओतण्यात येते. जुन्यात आडात पाणी ओतल्याने ते घाण झाले आहे, तरीही वापरण्यासाठी लोक पाणी शेंदून नेत आहेत.
दुष्काळामुळे यंदा गावात वाजला नाही सनई-चौघडा, सोलापुरातील बंकलगीमधील स्थिती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2019 5:53 AM