बाबोऽऽ मोबाईल ? लय भ्याव वाटतंय !
सार्वजनिक क्षेत्रात वावरणाऱ्या ‘खादी’धाऱ्यांचं खाजगी जीवन तसं आजपावेतो खूप ‘सेफ’ होतं. स्टेजवर नैतिकतेच्या गप्पा मारणाऱ्यांची नीतिमत्ता ‘पर्सनल लाईफ’मध्ये कशी होती, हे जनतेला माहीत नव्हतंं. मात्र आता मोबाईलच्या युगात ऑडिओ-व्हिडीओ क्लिपनं अनेकांची पोलखोल होऊ लागलीय. यामुळंच की काय, खादी म्हणतेय ‘बाबोऽऽ मोबाईल.. लय भ्याव वाटतंय !’
वाळू ठेकेदार म्हणू नये आपुला!
आता करमाळ्याच्या नारायण आबांचंच घ्या ना. गडी कुणाच्या अध्यात ना मध्यात. आपण भलं, आपली आमदारकी भली.. पण रश्मीताईंच्या मोबाईलवर तो सूर्यवंशीचा सतीश ढसाढसा रडला. त्या ‘ऑडिओ क्लिप’मुळं पाटलांचा गट भलताच कामाला लागला. आता ही क्लिप सतीशनं व्हायरल केली की रश्मीताईनं...याचा शोध लागेल तेव्हा लागेल; परंतु ती इनोव्हा गाडी नेमकी कुणाची, याचं उत्तर काही करमाळ्याच्या जनतेला सापडेना झालंय रावऽऽ.तरी नशीब म्हणायचं. त्या सतीशनं ‘प्रिन्स’ला कॉल केला नाही... नाहीतर ‘सैराट’चं झिंगाटही कमी पडलं असतं त्या ऑडिओ क्लिपमध्ये.. कारण दोघेही भारी. एक रडका. दुसरा चिडका. झालं असतं की नाही.. झिंग झिंग झिंगाट? असो. सध्याच्या डिजिटल युगात या सोशल मीडिया अस्त्राची तीक्ष्णता बहुधा रश्मीताईंनी अचूक ओळखली असावी. म्हणूनच की काय, सतीशशी बोलताना त्या अत्यंत सावधपणे एकेक वाक्य उच्चारत होत्या. आपण कुठंही शब्दात सापडणार नाही, याची परफेक्ट काळजी घेत होत्या.
राहता राहिला विषय राजकारणातल्या दोस्तीचा. नारायण आबांचा मित्र सतीश म्हणे वाळू ठेकेदार.. आता ठेकेदाराला भाषा कळत असते फक्त ‘लक्ष्मी’चीच. तो ‘अधिकाऱ्याची बोली’ लावण्यात जेवढा माहीर, तेवढाच ‘खादीचा लिलाव’ मांडण्यातही तरबेज. त्यामुळं अशा धंदेवाईक पिलावळींना किती गोंजारायचं असतं, हे समजलं नाही तर ‘प्रत्येकाच्या मोबाईल स्क्रीनवर अब्रूचं खोबरं’ व्हायला वेळ नाही लागत.
होली बिडू...सुम्म कुंडरू !
‘दक्षिण’मध्ये सुभाषबापूंच्या भुकटीला हात घातला मंद्रुपच्या आप्पारावनं. खरंतर बापू राज्याचे मंत्री. त्यांची पोहोच दिल्लीपर्यंत. कोरेंचा हा दादा एका छोट्या गावचा माजी सरपंच. तरीही ‘खाकी’च्या ठाण्यापर्यंत पोहोचवली ‘बापूं’ची भुकटी. हा सारा चमत्कार घडला एका मोबाईलमुळे. गेल्या वर्षी या भुकटी प्रकल्पाची एक छोटीशी बातमी मुंबईच्या मीडियात आलेली. त्याचं कात्रण कुठूनतरी दादांच्या मोबाईलवर पडलेलं.. ते पाहून दादांची उत्सुकता ताणली गेली. प्रकल्पाचा शोध सुरू झाला. ‘आरटीआय’ची फाईल टाकली गेली. बरीच कागदपत्रं हाती आली. त्यानंतर दादा कामाला लागले.विशेष म्हणजे, ही सारी कागदपत्रंं गोळा करताना पिताश्री गोपाळराव सारखं म्हणायचे, ‘मोठ्यांच्या नादी लागू नकोस. होली बिडू, सुम्म कुंडरूऽऽ’.. म्हणजे जाऊ दे सोड, गप्प बस. पण दादा कुठले गप्प बसायला ? केस दाखल होईपर्यंत फॉलोअप घेत राहिले. थोडक्यात सांगायचं तर भुकटीपायी सबसिडी आली. त्याच्या बातमीपायी आरटीआय फाईल रंगली. सारी यंत्रणा कामाला लागली. हे सारे घडले केवळ एका मोबाईलपायी... म्हणूनच भ्याव वाटतंय. मग लगाव बत्ती...
नेत्यांचं ‘पर्सनल लाईफ’ही धोक्यात !
मोबाईलवरच्या या ‘क्लिप’नं आजपावेतो अनेकांना कामाला लावलेलं. पंढरीच्या धाकट्या पंतांनीच जिल्ह्यात याची ‘बोहणी’ केलेली. मिलिटरीचा जोक त्यांना भलताच महागात पडला. पानमंगरूळमध्ये रंगलेली खासदार वकिलांची इरसाल गावरान कहाणीही पार्टीची टोपी उडवून गेली. कोणत्याही चॅनलचा कॅमेरा नाही म्हणून बोलून गेलेल्या प्रणितीताईंचा डॉयलॉगही याच मोबाईलमुळं गाजलेला. त्यानंतर नंबर लागला दीपक आबांचा.. अन् आता तर नारायण आबांच्या नावानं खडे (वाळूचे नव्हे!) फोडणाऱ्या कार्यकर्त्यानं जिल्ह्यात धुमाकूळ माजविलाय.या साऱ्या ‘क्लिप’मधून एक स्पष्ट झालंय... जिल्ह्यातल्या नेतेमंडळींना खूप जपून बोलावं लागणारंय. अगदी खाजगीतही... कारण सार्वजनिक क्षेत्रात वावरणाऱ्या या नेत्यांचं खाजगी जीवनही मोबाईलनं पुरतं चव्हाट्यावर आणून ठेवलंय... म्हणूनच एखादी ‘क्लिप’ वाजली की नेता दचकून म्हणतो, ‘बाबोऽऽ मोबाईल? लय भ्याव वाटतंया !’
नारायण आबांकडं म्हणं असल्या बक्कळ गाड्या!
आजकालच्या नेतेमंडळींना गाड्यांचा सोस भलताच. पूर्वीच्या काळी झेडपी मेंबर ‘जीप’मध्ये अन् आमदार ‘अॅम्बॅसिडर’मध्ये, हीच राजकीय ओळख कैक वर्षे होती. ग्लोबलायझेशननंतर गाड्यांचा सुकाळ झाला. आमदार ‘सुमो’त बसू लागले. सरपंच बुलेटवर फिरू लागला. त्यानंतरच्या ‘स्कॉर्पिओ’तून उतरून हीच आमदार मंडळी ‘इनोव्हा अन् फॉर्च्युनर’मध्ये झळकू लागली. आता तर यांच्या इम्पोर्टेड गाड्यांची किंमत पेटीतून खोक्यात.कुठून येतो एवढा पैसा? पार्टी बदलावी इतक्या सहजपणे कशा काय बदलतात, ही सारी मंडळी गाड्या? सर्वसामान्य जनतेला पडलेला हा भाबडा प्रश्न, करमाळ्यातील आॅडिओ क्लिप व्हायरल प्रकरणानंतर उलगडला. कार्यकर्त्यांच्या प्रेमाखातर म्हणे नेत्यांना या गाड्या भेट म्हणून मिळत असतात. नारायण आबा तर मोठ्या कौतुकानं सांगतात, ‘माझ्याकडे अशा कितीतरी गाड्या पडून आहेत, लोकांनी प्रेमाखातर भेट दिलेल्या. मलाही आठवत नाही, बघा या गाड्यांची संख्या!’आजकाल गड्ड्यातली इटुकली खेळणी कारही लोक भेट नाही देत. इथंतर लाखमोलाच्या गाड्या कार्यकर्त्यांच्या प्रेमाखातर वापरल्या जातात. वॉवऽऽ किती ग्रेट ना. गाडी नेत्याची, नाव कार्यकर्त्याचं.. पण क्लिप वाजताच दर्शन होतं हप्त्याच्या पावतीचं. ‘इन्कम टॅक्स’वाले गोंधळात. ‘निवडणूक’वाले तर महागोंधळात. यालाच म्हणतात भारतीय लोकशाही... लगाव बत्ती...