सोलापूर : लोकसभा निवडणुकीसाठी सोलापूर मतदारसंघातून भाजपकडून उभे असलेले डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या प्रचारासाठी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. पण युवा सेनेच्या कार्यकर्त्यांची समजूत काढण्याकडे दुर्लक्ष झाल्याने तरुण कार्यकर्ते मात्र संभ्रमावस्थेत दिसत आहेत.
लोकसभेसाठी भाजप-सेनेची युती झाली. गेल्यावेळेस विधानसभेला एकमेकांविरोधात लढलेले उमेदवार व कार्यकर्ते आता एकत्र आले आहेत. ही एकी होताना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या मनात काही शंका होत्या. नगरसेवक व युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी ही शंका बोलून दाखविली. याची दखल घेत शिवसेनेच्या पदाधिकाºयांनी नगरसेवकांच्या मनातील शंका दूर केली. झालं गेलं विसरून आता पुढील विधानसभेचे लक्ष ठेवून कामाला लागा अशा सूचना जिल्हाप्रमुख महेश कोठे, गणेश वानकर, सहसंपर्कप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, समन्वयक पुरूषोत्तम बरडे, शहराध्यक्ष हरिभाऊ चौगुले यांनी दिल्याने कार्यकर्ते कामाला लागले आहेत. काही भाजप कार्यकर्त्यांची समजूत शिवसेनेच्या पदाधिकाºयांनी घातली.
शिवसेना महिला आघाडीनेही कामाला सुरूवात केली आहे. शहरातील तिन्ही मतदारसंघाची जबाबदारी शहरप्रमुख अस्मिता गायकवाड सांभाळत आहेत. कार्यालयात मेळाव्याची तयारी सुरू होती. मंगळवेढ्याची जबाबदारी जिल्हा परिषद सदस्य शैला गोडसे तर अक्कलकोट, दक्षिण सोलापूर तालुक्याची जबाबदारी येलुरे यांच्याकडे देण्यात आली आहे. भाजपच्या पदाधिकाºयांसमवेत समन्वय साधून प्रचाराची यंत्रणा लावल्याचे अस्मिता गायकवाड यांनी सांगितले. युवा सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपच्या पदाधिकाºयांनी विश्वासात घेतले नसल्याबद्दल गाºहाणे घातले आहे.
माझ्यासोबत सर्वजण आहेतभाजप-शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते त्याचबरोबर इतर सर्वजण काम करीत आहेत. सकारात्मक व रचनात्मक पद्धतीने काम सुरू आहे. प्रत्येकावर दिलेल्या जबाबदारीप्रमाणे काम सुरू आहे.- डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य, भाजप़
आमची पूर्ण ताकद उभी करण्याचा प्रयत्नयुती झाल्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांनी सर्वांना विश्वासात घेऊन लोकसभा यशस्वी करण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे भाजपचे पदाधिकारी आम्हाला विश्वासात घेत आहेत. आमचे काम जोमाने सुरू आहे.- महेश कोठे, जिल्हाप्रमुख, शिवसेना़
- - शहर उत्तर : या विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी प्रताप चव्हाण, अमोल शिंदे यांच्यासह सात जणांची समिती आहे. कार्यकर्ते प्रचारात व्यस्त दिसले.
- - मंगळवेढा : ग्रामीण भागात शिवसेना आहे. विधानसभा लढविणारे समाधान आवताडे यांची भूमिका स्पष्ट नाही. तालुकाध्यक्ष तुकाराम कुदळे बांधणी करीत आहेत.
- - शहर मध्य. : नगरसेवक गुरूशांत धुत्तरगावकर, राजकुमार हंचाटे, सुरेश कोकटनूर यांच्यासह मोठी फौज काम करीत आहे. आमदार काँग्रेसचे आहेत, त्यामुळे ताकद लावली आहे.
- - दक्षिण सोलापूर :पंचायत समिती सदस्य अमर पाटील, तालुकाध्यक्ष योगीराज पाटील यांचे काम सुरू आहे. जुने कार्यकर्ते मात्र विश्वासात घेत नसल्याचे सांगत आहेत
- - अक्कलकोट: तालुक्यात नव्याने नियुक्त केलेले संजय देशमुख यांनी यंत्रणा लावली आहे. मध्यंतरी पडझड झालेल्या शिवसेनेच्या बांधणीला त्यांनी महत्त्व दिले आहे.
- - मोहोळ : अशोक भोसले यांच्यावर नव्याने जबाबदारी. पूर्वीपासून गट आहेत. भाजपने पत्रिकेत नाव टाकल्यावरून वाद झाला आहे. त्यामुळे प्रचारात विस्कळीतपणा आहे.