सोलापूर/सांगोला : आमदार शहाजीबापू पाटील यांना मंत्री करा म्हणून कट्टर शिवसैनिक केदार साळुंखे हे सायकलवरून मुंबईला निघाले आहेत. पंढरपूरच्या पांडुरंगाला साकडे घालून मुंबईत गेल्यावर मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन पत्राद्वारे बापूंना मंत्री करण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या सोशल मीडियावरही काय झाडी, काय डोंगार... अशा टॅगलाईनने शहाजी बापू पाटील यांना पर्यटनमंत्री करा, अशी मागणी होत आहे. त्यातच, सांगोल्यातून एक कार्यकर्ता मुंबईकडे निघाला आहे.
शिवसैनिक केदार साळुंखे यांनी पारे गावातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सायकल प्रवासाला सुरुवात केली आहे. मुंबईला जाताना वाटेत श्रीक्षेत्र पंढरपूर येथे पांडुरंगाला साकडे घालून तेथून पुढील प्रवासासाठी ते मार्गस्थ झाले आहेत. सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेकडून एकमेव आमदार शहाजीबापू पाटील हे निवडून आले आहेत. त्यांना मंत्री करा म्हणून मुंबईत गेल्यावर एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन पत्र देणार आहे. त्याठिकाणी आमदार शहाजीबापू पाटील यांची भेट घेऊन त्यांच्या भूमिकेला पाठिंबाही देणार असल्याचे केदार साळुंखे यांनी सांगितले.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याचा अत्यानंद - पाटील
एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करणार आहेत, हे कुणालच माहिती नव्हतं. एकनाथ शिंदेंनाच माहिती होतं की नाही याची मला शंका आहे, कदाचित त्यांनाच मुंबईत गेल्यावर हे कळलं असावं. मग, शिंदे मुख्यमंत्री होणार आहेत, म्हटल्यावर मला पीएनं उठवलं. मी दणा दणा दणा गादीवर उड्या मारल्या. पांडुरंगाच्या पाया पडलो, तुळजाभवानीच्या पाया पडलो, स्वामी समर्थाच्या पाया पडलो की या राज्याला किती दिवसांनी सोन्यासारखा मुख्यमंत्री मिळाला, अशा शब्दात शहाजी पाटील यांनी अत्यानंद झाल्याचे सांगितले. तसेच, मी सत्तेचा लोभी नसून मी साधारण, सरळमार्गी माणूस आहे, असेही ते मंत्रीपदाबाबत म्हणाले.