साेलापूर : पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पाेटनिवडणुकीची आचारसंहिता केवळ मतदारसंघापुरती मर्यादित नाही. महापालिकेसह संपूर्ण जिल्ह्यासाठी लागू झाल्याचे पत्र सर्व कार्यालयांना पाठविण्यात आले आहे. बुधवारपासून आचारसंहितेची अंमलबजावणी हाेईल, असे उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी भारत वाघमारे यांनी 'लाेकमत'ला सांगितले.
पंढरपूर मतदारसंघाची आचारसंहिता ही केवळ मतदारसंघापुरती मर्यादित असेल, असा सूर जिल्हाधिकारी आणि महापालिकेतील अधिकाऱ्यांकडून काढला जात हाेता. यावर वाघमारे म्हणाले, सर्व शासकीय कार्यालयांच्या प्रमुखांना आचारसंहितेच्या अंमलबजावणीबाबत पत्र पाठविण्यात आले आहे. या कार्यालयांनी आवश्यक त्या उपाययाेजना करायच्या आहेत.
दरम्यान, काेराेनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बुधवारी आढावा बैठकीचे आयाेजन केले आहे. जिल्हा परिषदेची अंदाजपत्रकीय सभा २५ मार्च राेजी आयाेजित करण्यात आली आहे. पंढरपूरची मतमाेजणी २ मे राेजी हाेणार आहे. यादरम्यान आचारसंहितेमुळे या सर्व बैठकांवर गंडांतर येऊ शकते, असे निवडणूक कार्यालयाकडून सांगण्यात आले.
स्थायी समितीच्या निवडणुकीवरही प्रश्नचिन्ह
महापालिकेच्या स्थायी व परिवहन समितीच्या सदस्य निवडीचा ठराव शासनाने निलंबित केला आहे. ही निवडणूकही स्थगित झाली आहे. याविरुद्ध भाजपने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. याचिकेवर निर्णय झाला तरी पंढरपूरच्या आचारसंहितेमुळे स्थायी व परिवहनची निवडणूक हाेईल की नाही याबद्दलही पालिकेत चर्चा हाेती. जिल्हा प्रशासनाने यापूर्वी ग्रामपंचायतीच्या आचारसंहितेमुळे महापालिकेच्या गाळेभाढेवाढीसंदर्भात आयाेजित केलेली त्रिस्तरीय समितीची बैठक रद्द केली हाेती. त्यामुळे प्रशासन स्थायी समितीच्या निवडणुकीसंदर्भातही मार्गदर्शन घेणार आहे.