नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थांचा ऑनलाइन शिक्षणावर भर, वर्गात ५१ टक्के विद्यार्थ्यांची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2021 03:22 PM2021-01-06T15:22:56+5:302021-01-06T15:23:06+5:30
४९ टक्के विद्यार्थ्यांची वर्गात गैरहजेरी : कोराेनाची दहशत विद्यार्थ्यांच्या मनात कायम
रूपेश हेळवे
सोलापूर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे आठवीपर्यंतचे शिक्षण हे ऑनलाइन तर नववी ते बारावीचे वर्ग ऑफलाइन पद्धतीने सुरू आहेत. पण नववी ते बारावीमधील विद्यार्थी ऑफलाइन शिक्षणापेक्षाऑनलाइन शिक्षणाला प्राधान्य देत आहेत. गेल्या महिनाभरात सरासरी ५१ टक्के विद्यार्थी हे ऑफलाइन शिक्षण घेत आहेत. शाळा व कनिष्ठ महाविद्यालय सुरू करण्यासाठी प्रशासनाने नियमावली जाहीर केली. यानुसार पालकांकडून शाळा प्रशासनाने संमतीपत्र घेऊन २३ नोव्हेंबरपासून शाळा ऑफलाइन पद्धतीने सुरू करण्यात आल्या. यात ज्या विद्यार्थ्यांनी संमतीपत्र दिले नाही, त्यांचे ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. पण पालकांनी संमतीपत्र देऊनही अनेक विद्यार्थी शाळेत न येता ऑनलाइन शिक्षण घेत आहेत. यामुळे कोरोनाची दहशत अजूनही विद्यार्थी आणि पालकांच्या मनात दिसून येत आहे.
एकही विद्यार्थी संक्रमित नाही
कोरोनामुळे नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग ऑफलाइन भरवण्यात आले. यामुळे कोरोनाचे संक्रमण वाढेल असे बोलले जात होते. पण ऑफलाइन शिक्षण सुरू होऊन एक महिना झाला, अद्याप एकही विद्यार्थी शाळेत आल्यामुळे कोरोनाने संक्रमित झालेला नाही.
जिल्ह्यातील १०५४ शाळांमध्ये नववी ते बारावीचे वर्ग भरवले जात आहेत. यात गणित, विज्ञान आणि इंग्रजी या तीन विषयांचे शिक्षक वर्गावर येऊन शिकवत आहेत. वर्गात येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे शाळांनी विशेष लक्ष देण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत. यात जवळपास ५१ टक्के विद्यार्थी वर्गावर येऊन शिकत आहेत, तर उर्वरित विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेत आहेत.
- संजयकुमार राठोड,
प्र. माध्यमिक शिक्षणाधिकारी