सोलापुरातील होम मैदान आज रिकामं करा : आयुक्त ओके.. आम्ही तयार आहोत : काडादी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2019 12:17 PM2019-02-01T12:17:54+5:302019-02-01T12:20:02+5:30
सोलापूर : दरवर्षी फेब्रुवारीच्या दुसºया आठवड्यापर्यंत सिध्देश्वर देवस्थान पंचकमिटीच्या ताब्यात असलेले होम मैदान रिकामे करण्याचे यंदा ३१ जानेवारी रोजीच ...
सोलापूर : दरवर्षी फेब्रुवारीच्या दुसºया आठवड्यापर्यंत सिध्देश्वर देवस्थान पंचकमिटीच्या ताब्यात असलेले होम मैदान रिकामे करण्याचे यंदा ३१ जानेवारी रोजीच आदेश महापालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिले असून, शुक्रवारी होम मैदान रिकामे करून ताब्यात घ्या, असे त्यांनी गुरुवारी नगर अभियंता संदीप कारंजे यांना दिलेल्या आदेशात नमूद केले आहे.
होम मैदान गुरुवारी रात्री गजबजलेले होते, परंतु आयुक्तांच्या आदेशानुसार शुक्रवारी मैदान रिकामे करण्याची कारवाई सुरू होईल, असे कारंजे यांनी सांगितले. दरम्यान, पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी शुक्रवारी होम मैदान महापालिकेच्या ताब्यात देण्याची तयारी दर्शविली आहे.
शासन आदेशानुसार होम मैदान महापालिकेच्या ताब्यात आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात झालेल्या करारानुसार १५ डिसेंबर ते ३१ जानेवारी या कालावधीत होम मैदान सिद्धेश्वर देवस्थान यात्रा कमिटीच्या ताब्यात देण्यात येते. स्मार्ट सिटी योजनेतून होम मैदानाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. मैदानाचे रुपडे पालटले आहे. त्यामुळे यावर्षीपासून होम मैदानावर केवळ धार्मिक विधी व्हावेत. गड्डा यात्रेमुळे होम मैदानाचे नुकसान होईल. त्यामुळे गड्डा इतरत्र भरविण्यात यावी, असा प्रयत्न महापालिका प्रशासनाने केला होता, परंतु यात्रा कमिटीने नकार दिला. महापालिकेने यावर्षी मैदानाचे ४५ दिवसांसाठी हस्तांतरण करताना यात्रा कमिटीवर काही अटी लावल्या आहेत. ज्या स्थितीत मैदान दिले त्याच स्थितीत ते परत करण्यात यावे या मुख्य अटीचा त्यात समावेश आहे.
होम मैदानाचे सुशोभीकरण करणाºया कंपनीवर पुढील तीन वर्षे मैदानाच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी आहे. या कंपनीने १५ जानेवारी रोजी मैदानाची पाहणी करुन अनेक ठिकाणी मैदानाचे नुकसान झाल्याचे पत्र आणि फोटो महापालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांना दिले होते. आयुक्तांनी पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश भूमी व मालमत्ता विभाग आणि नगर अभियंत्यांना दिले होते. यादरम्यान, गुरुवारी सायंकाळी महापालिका आयुक्त डॉ. ढाकणे यांनी नगर अभियंता संदीप कारंजे यांना फोन करून मैदान ताब्यात घेण्याची कारवाई सुरू करा, असे आदेश दिले आहेत.
पण मैदान गजबजलेले आहे...
- यात्रा कमिटीने दरवर्षी ३१ जानेवारी रोजी मैदानाचा ताबा महापालिकेला देणे अपेक्षित असते. पण गड्डा यात्रा ५ ते १० फेब्रुवारीपर्यंत सुरू असते. त्यानंतर मैदान महापालिकेच्या ताब्यात दिले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून हीच पद्धत सुरू आहे. गुरुवारी रात्री होम मैदान गजबजलेले होते. अनेक स्टॉल धारकांना आयुक्तांच्या आदेशाबाबत माहिती नव्हती. महापालिकेची यंत्रणा शुक्रवारी काय कारवाई करते याकडे लक्ष आहे.
ज्या स्थितीत मैदान दिले होते त्या स्थितीत परत करावे लागेल. मैदानावर कमीत कमी नुकसान झाले असेल तर ही चांगली बाब आहे, परंतु जेवढे नुकसान झाले आहे. त्याची भरपाई तर द्यावीच लागणार आहे. यात्रा कमिटीने दिलेल्या आराखड्यात जी जागा मोकळी होती त्या जागेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी हेलिपॅड तयार करण्यात आले. या दौºयाचा आणि गड्डा यात्रेतील कामांचा संबंध नाही. यात्रा कमिटीने आता मुदतवाढीसाठी अर्ज दिला आहे. पण तो स्वीकारण्याचा प्रश्न नाही. गड्डा यात्रा ही काही भाडे मिळविण्यासाठी नाही. करारानुसार मैदान रिकामे करावे लागेल.
- डॉ. अविनाश ढाकणे, आयुक्त, महापालिका.
होम मैदानावर यात्रा भरविण्यास यंदा उशीर झाला. यात्रा भरायला सुरुवात झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा झाला. या काळात दोन दिवस काम बंद ठेवण्यात आले होते. आम्ही प्रशासनाला सहकार्य केले. आणखी ८ ते १० दिवस मुदतवाढ द्यावी, असे पत्र महापालिकेला पाठविले आहे. स्टॉलधारक तोट्यात आहेत. त्यांच्यासाठी किमान मुदतवाढ द्यायला हवी होती. पण प्रशासन तयार नसल्याने आम्ही शुक्रवारीच महापालिकेला मैदानाचा ताबा देणार आहोत.
- धर्मराज काडादी, अध्यक्ष, देवस्थान पंच कमिटी