आघाडी सरकारकडून ३४ दिवसांनंतरही उपोषणकर्त्यांची साधी विचारपूसही नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:22 AM2021-07-26T04:22:06+5:302021-07-26T04:22:06+5:30

अकलूज - माळेवाडी ग्रामपंचायतीचे नगर परिषदेत आणि नातेपुते ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीत रुपांतर करण्यासाठी प्रशासकीय सर्व बाबींची पूर्तता केल्यानंतर दीड ...

Even after 34 days from the alliance government, there is no simple questioning of the protesters | आघाडी सरकारकडून ३४ दिवसांनंतरही उपोषणकर्त्यांची साधी विचारपूसही नाही

आघाडी सरकारकडून ३४ दिवसांनंतरही उपोषणकर्त्यांची साधी विचारपूसही नाही

Next

अकलूज - माळेवाडी ग्रामपंचायतीचे नगर परिषदेत आणि नातेपुते ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीत रुपांतर करण्यासाठी प्रशासकीय सर्व बाबींची पूर्तता केल्यानंतर दीड वर्षापासून राज्यातील महाविकास आघाडी शासनाने अंतिम अध्यादेश काढले नाहीत. राज्यातील काही ग्रामपंचायतींच्या प्राथमिक उद्घोषणांची कार्यवाही सुरू असतानाच शासनाने ‘त्या’ ग्रामपंचायतींचे नगर पंचायतीत रूपांतराचे अध्यादेश काढले.

यामुळे अकलूज, माळेवाडी व नातेपुते ग्रामपंचायत रुपांतराच्या प्रक्रियेत राजकीय व्देषातून अंतिम अध्यादेश काढले नसल्याची तिन्ही गावच्या नागरिकांनी भावना व्यक्त करीत शासनाच्या निषेधासाठी व अंतिम अध्यादेश लवकरात लवकर काढावे, या मागणीसाठी प्रथम १८ जूनला माळशिरस तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करुन साखळी उपोषणाचा इशारा दिला. त्याची राज्य शासनाने दखल न घेतल्याने २२ जूनपासून माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते - पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज प्रांत कार्यालयासमोर साखळी उपोषणाला सुरुवात केली. आज ‘त्या’ उपोषणाला ३४ दिवस पूर्ण झाले आहेत.

यांनी भेटी देऊन पाठिंबा दर्शविला

मागील महिन्यात उपोषणस्थळाला राज्याचे विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भारतीय जनता पार्टीच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ, माढा लोकसभा मतदारसंघाचे खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर, सहकार महर्षी कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते - पाटील, आ. प्रशांत परिचारक, आ. राम सातपुते, आ. रणजितसिंह मोहिते - पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, जिल्हा परिषद सदस्या शीतलदेवी मोहिते - पाटील यांच्यासह अनेकांनी भेटी देऊन उपोषणकर्त्यांना पाठिंबा देत राज्य सरकारच्या राजकीय सुडाची भावना व दुजाभाव भूमिकेवर टीका केली.

...यांनी केला आघाडी सरकारचा निषेध

साखळी उपोषणात भाजपचे जिल्हा संघटक सरचिटणीस धैर्यशील मोहिते - पाटील, उपसरपंच शिवतेजसिंह मोहिते - पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली अकलूजच्या सरपंच पायल मोरे, नातेपुतेच्या सरपंच कांचन लांडगे, उपसरपंच अतुल पाटील, माळेवाडीचे सरपंच जालिंदर फुले, उपसरपंच अरुण खंडागळे यांच्यासह आजपर्यंत तिन्ही गावांचे ८९६० ग्रामस्थ सहभागी झाले होते. १०५ संघटनांनी उपोषणाला पाठिंबा दिला. उपोषणात ग्रामस्थांनी स्वत: आत्मक्लेश करून सरकारला जागे करण्यासाठी विविध आंदोलने करून सरकारचा निषेध केला. महाविकास आघाडीचा तिसरा, दहावा, तेरावा घालण्याबरोबर वडार समाजाने दगडफोडो, देऊळवाले समाजाने आसूड मारून घेऊन, होलार समाजाने पारंपरिक वाद्य वाजवून, जागारण पार्ट्यांनी गोंधळ घालून, तृतीय पंथीयांनी टाळ्या वाजवून, हालगी नाद आंदोलन करून सरकारचा निषेध केला आहे.

न्यायालयातच होईल निर्णय

अकलूज नगर परिषदेसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. १७ जुलैला याचिकेच्या सुनावणीप्रसंगी सरकारी वकिलांनी शासनाची बाजू मांडताना तीन आठवड्यात शासनाचा अंतिम निर्णय न्यायालयात सादर करण्यासाठी मुदत मागितली. उच्च न्यायालयाने सरकारी वकिलांची मागणी मंजूर करून शासनाला निर्णय सादर करण्यास सांगितले आहे. यापुढे ७ ऑगस्टला सुनावणी ठेवली आहे. आता न्यायालयातच नगर परिषदेबाबत निर्णय होईल.

...यांनी दिले सहकार्याचे आश्वासन

अकलूज - माळेवाडी नगर परिषद व नातेपुते नगर पंचायत व्हावी, यासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते - पाटील, आ. रणजितसिंह मोहिते - पाटील, भाजपाचे नेते धैर्यशील मोहिते - पाटील, अकलूजचे उपसरपंच शिवतेजसिंह मोहिते - पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, नातेपुतेचे उपसरपंच अतुल पाटील, माळेवाडीचे सरपंच जालिंदर फुले, उपसरपंच अरुण खंडागळे यांच्या शिष्टमंडळाने मुंबईत भेट घेऊन आपली मागणी मांडली आहे. त्यांनी या प्रकरणात लक्ष घालून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.

फोटो लाईन ::::::::::::::::::::::::::

अकलूज नगर परिषद व नातेपुते नगर पंचायत व्हावी, या मागणीसाठी आज ३४व्या दिवशी उपोषणकर्त्यांनी प्रांताधिकारी यांच्या प्रतिनिधीला निवेदन दिले.

250721\1754-img-20210725-wa0011.jpg

अकलुज नगरपरीषद व नातेपुते नगरपंचायत व्हावी या मागणी साठी आज ३४ व्या दिवशी उपोषणकर्त्यांनी प्रांताधिकारी यांच्या प्रतिनिधीला निवेदन दिले.

Web Title: Even after 34 days from the alliance government, there is no simple questioning of the protesters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.