सोलापूर : पाण्याचा एक थेंबही नसताना दुष्काळी परिस्थितीत शहराच्या हद्दीत शंभर एकर क्षेत्राचे नंदनवन झाले आहे. शासकीय रानात ज्वारी, हरभरा व करडईची पिके या ठिकाणी सध्या उंच भरारी घेत आहेत. सोलापूर-हैदराबाद महामार्गावरील मार्केट यार्ड ते दहिटणेपर्यंतच्या शासनाच्या जमिनीवर ही शेती फुलविण्यात आली आहे.
विभागीय कृषी संशोधन केंद्र, पुणे यांच्या नियंत्रणाखालील मुळेगाव फार्म हाऊसवरील प्रक्षेत्र अधीक्षक प्रा. एस. बी. थोरवे यांच्या नेतृत्वाखालील टीमने घेतलेल्या कष्टाचे परिणाम या ठिकाणी दिसून येत आहेत. शहराच्या हद्दीत व वर्दळीच्या ठिकाणी शासकीय जमिनीत दिसणारी पिके सर्वांनाच आश्चर्यचकीत करीत आहेत. ५० एकर क्षेत्रावर कोरडवाहू रानात आलेली, उंचच्या उंच वाढलेली ज्वारी सर्वांचे प्रमुख आकर्षण बनले आहे. पाण्याचा एक थेंबही नसताना हरभरा व करडई या ठिकाणी सध्या हंगामाच्या अंतिम टप्प्यात आले आहे. ३० एकर क्षेत्रावर करडई तर १० एकर क्षेत्रावर आलेला हरभरा कौतुकास्पद ठरत आहे. शंभर एकरातील उभ्या पिकांचे रक्षण करण्यासाठी अत्यंत अपुरा मनुष्यबळ असतानाही या ठिकाणी पिकाचे एक धाटही उपटल्याचे दिसून येत नाही.
संशोधन केंद्राच्या या युनिटमार्फत दरवर्षी खरीप व रब्बी पिकांचे उत्पादन आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने घेण्यात येते. यंदाच्या रब्बी हंगामात घेण्यात आलेल्या पिकांची चांगली वाढ झाल्याने जिल्ह्यातील शेतकºयांना हा प्रयोग पाहण्यासारखा झाला आहे. पिकांची कोळपणी सहा ते आठ वेळा करण्यात आली आहे. जमिनीच्या हलक्या व भारी प्रकारानुसार या ठिकाणी मालदांडी, फुले, सुचित्रा, वसुदा, यशोदा आदी ज्वारी बियाणांची पेरणी करण्यात आली आहे. हरभºयासाठी विजय, दिग्विजय तर करडईसाठी एसएसएफ बियाणांची पेरणी करण्यात आली आहे. पेरणी पश्चात आवश्यक अन्नद्रव्ये पुरविण्यात आली आहेत. पेरणी करताना खत खाली व बी वर राहील, या पद्धतीने पेरणी करण्यात आल्याने पिकांची चांगली वाढ होत असल्याची माहिती येथील अधिकाºयांनी दिली.
राष्ट्रीय महामार्गाच्या लगत व शहरातच शंभर एकरावर फुलविण्यात आलेल्या या शेतीला कोणाचेही उपद्रव दिसून येत नाही. पिकांची निगराणी करण्यासाठी कंत्राटी तत्त्वावर काही कर्मचाºयांची नेमणूक करण्यात आली आहे. शासनाच्या रानात अन् तेही वर्दळीच्या ठिकाणी शहरात फुलविण्यात आलेली ही शेती सर्वांसाठीच आकर्षित ठरणारी झाली आहे. पुणे विभागीय कृषी संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. विजय अमृतसागर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेला हा उपक्रम शेतकºयांसाठी उत्सुकतेचा विषय ठरला आहे. त्यामुळे या ठिकाणी पिकांची पाहणी करण्यासाठी गर्दी करीत असून, त्यांना पिकांचे तंत्रज्ञान व शास्त्राची माहिती देण्यात येत आहे. यासाठी येथील कृषी सहायक गणेश कटारे, वैशाली मलाबादे आदींसह अन्य कर्मचारी परिश्रम घेताना दिसून येत आहेत.
वाफेतच अडवून जिरवले पाणी- या पिकांच्या यशाचे गमक सांगताना प्रा. थोरवे म्हणाले, पेरणीपूर्वी दरवर्षी जमिनीत बंदिस्त वाफा करण्यात येतात. सहा बाय सहा किंवा दहा बाय दहा फूट खोल असणाºया या वाफेत पडणाºया पावसाचे पाणी अडवून जिरविण्यात येते. पेरणी करतानाही दीड फूट खाली बियाणांची पेरणी करण्यात येते. खाली खत व वर बियाणे राहील, अशा पद्धतीने पेरणी होते. या तंत्रामुळे पिकांच्या उत्पादकतेत सुमारे दीडपट वाढ होेते. शेतकºयांनी वाफे करून रानात पडणाºया पावसाचे पाणी जिरवावे, असे आवाहन थोरवे यांनी केले आहे.