इथेही तिची संकटानं पाठ सोडलीच नाही...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 03:42 PM2018-12-28T15:42:42+5:302018-12-28T15:45:03+5:30
मोहन डावरे पटवर्धन कुरोली : पतीने सोडून दिलेले.. आजार पाचविला पुजलेला... पदरात दोन-तीन महिन्यांच्या जुळ्या मुली... ती स्वत: आजाराने त्रस्त.. वैद्यकीय उपचारासाठी एकही ...
मोहन डावरे
पटवर्धन कुरोली : पतीने सोडून दिलेले.. आजार पाचविला पुजलेला... पदरात दोन-तीन महिन्यांच्या जुळ्या मुली... ती स्वत: आजाराने त्रस्त.. वैद्यकीय उपचारासाठी एकही पैसा हातात नाही आणि पोटाला पोटभर अन्नही मिळत नाही.. अशा बिकट परिस्थितीत अट्टा लालसिंग तडवी (मु़ मोख, पो़ तलाई, ता़ धडगाव, जि. नंदूरबार) ही महिला ऊसतोड कामगार म्हणून शेकडो किलोमीटर अंतरावरून वडील आणि भावाच्या आधाराने पंढरपूर तालुक्यात आली...मात्र येथेही संकटाने तिची पाठ सोडली नाही. संकटकाळावर मात करण्यासाठी आजारपणही आपल्या पोटात घालून दोन जुळ्या मुलींना जगविण्यासाठी धडपडत असलेल्या अट्टाला एका चिमुरडीला मुकावे लागले.
बुधवारी सायंकाळी बिबट्यासदृश प्राण्याने जुळ्यापैकी एका मुलीवर हल्ला केल्याने तिचा मृत्यू झाला़ त्यामुळे हताश झालेली अट्टा गुरुवारी दिवसभर पालावर बसून होती़ तिच्या टोळीतील इतर कामगारही ऊस तोडणीसाठी न जाता पालावर खिन्न मन:स्थितीत बसून होते़
बुधवारी दिवसभर ऊस तोडल्यानंतर ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर आला़ त्यामुळे वाहन भरून द्यायचे, मगच घरी जायचे, या उद्देशाने इतर कामगार उसाचे वाहन भरू लागले़ मात्र अट्टाला दोन लहान मुली असल्याने तिला पालावर लवकर पाठविले़ ती पालावर आल्यानंतर दोन्हा तान्हुल्या मुलींना कोपीत झोपविले व ती स्वयंपाकाला लागली़ चूल पेटविली़ भात शिजवू लागली़ अट्टा चुलीला जाळ लावण्यात मग्न असताना मागून अचानक बिबट्यासदृश दोन प्राणी आले़ त्यातील एकाने कोपीत असलेल्या जुळ्या मुलींपैकी एकीचा जबडा पकडून तोंडात घेताच ते बाळ किंचाळले, तेव्हा हल्ला झाल्याचे अट्टाच्या लक्षात आले़
त्यानंतर आपल्या तान्हुल्याला प्राण्याने तोंडात धरल्याचे पाहून घाबरलेल्या अट्टाने आरडाओरड सुरू केली़ तिचा आक्रोश ऐकून पालाशेजारी असलेल्या गणपत पाटील व हरिदास पाटील या पिता-पुत्रांनी पालाकडे धाव घेत त्या प्राण्याला हुसकावून लावण्यासाठी मदत केली़ मात्र तोपर्यंत त्या बिबट्यासदृश प्राण्याने त्या बाळाचे तोंड, शरीराचे लचके तोडत हाताची बोटेही खाल्ल्याने ते बाळ त्या ठिकाणी निपचित पडून राहिले.
ही गोष्ट वाºयासारखी ट्रॅक्टरमध्ये ऊस भरत असलेले त्यांचे सहकारी कामगार व ग्रामस्थांपर्यंत पोहोचली़ त्यानंतर ग्रामस्थांनी व काही कामगारांनी ते बाळ जिवंत आहे की नाही, याची खात्री करण्यासाठी पटवर्धन कुरोली येथील खासगी डॉक्टर गौतम भिंगारे यांना दाखविले़ त्यांनी ते बाळ मयत असल्याचे घोषित केले़ त्यानंतर रात्री उशिरा शवविच्छेदन केल्यानंतर मध्यरात्री १ वाजता ट्रॅक्टर मालक दत्तात्रय कडलासकर यांच्या गावी देवडे (ता़ पंढरपूर) येथे त्या मयत चिमुरड्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले़ त्यानंतर हे सर्व कामगार पटवर्धन कुरोली येथील पालावर गेले़ पतीने सोडून दिल्यानंतर या जुळ्या मुलीच आपल्या भविष्याचा आधार बनून राहतील़ या भोळ्या आशेने आजारपणातही ऊस तोडणीसारखे कष्टाचे काम करीत भविष्याचा विचार करणाºया या ऊस तोडणी महिलेसमोर पुन्हा नवीन संकट उभे राहिले आहे.
- बुधवारी सायंकाळी हा प्रकार घडल्यानंतर अनपेक्षितपणे अट्टाला आपल्या एका चिमुरडीपासून काही तासातच मुकावे लागले़ त्यानंतर गुरुवारी सकाळपासून अट्टा आपल्या दुसºया चिमुरडीला मांडीवर घेऊन डोळ्यात अश्रू अन् सर्वांशीच अबोला धरत केवळ एकटक पाहत राहिली़ ती कुणाशीच काही बोलत नव्हती़ दिवसभर अन्न आणि पाणीही घेतले नाही़ तिचा हा अबोला अनेक प्रश्नांची उकल करीत होता़
सर्व कामगार पालावर, पण चूल पेटली नाही
- बुधवारी घडलेल्या या दुर्घटनेनंतर पालावरील सर्व ऊसतोड कामगार पालावर खिन्न अवस्थेत बसून होते़ कोणीही ऊस तोडणीसाठी गेले नाही़ शिवाय गुरुवारी दिवसभर त्यांच्या चुलीही पेटल्या नव्हत्या़ या ऊसतोड कामगारांच्या पालावर शोककळा पसरली होती़