मोबाईल युगातही दररोज ३५०० पत्रांचा आणि रजिस्टरचा बटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2020 01:02 PM2020-10-09T13:02:04+5:302020-10-09T13:03:38+5:30
आजपासून पोस्टल सप्ताह : काही पेट्यांमध्ये पत्रांचा ढिगारा तर काही कायम रिकाम्याच
सोलापूर : एकेकाळी शासकीय यंत्रणेबरोबर कुटुंबाच्या संवादाचे एकमेव माध्यम म्हणून ओळखले जाणारे पोस्टाचे कार्य इतिहासजमा होणार नाही, हे बदलत्या सेवेने दाखवून दिले आहे़ आजही जिल्ह्यात दररोज ३,५०० पत्रांचा आणि रजिस्टरचा बटवडा होतोय.
लॉकडाऊन काळातही टपाल सेवेत सातत्य राहिले आहे़ मात्र, या सेवेवर कोरोनाचा काहीअंशी परिणामही झालेला आहे़ काही पेट्यांमध्ये दिवसभर वाटलीतरी संपत नाहीत इतकी पत्रे येतात तर काहींमध्ये आठवड्यातून एखादे पत्र मिळते, अशीही स्थिती आहे.
जगभरात ९ ते १५ आॅक्टोबर हा पोस्टल सप्ताह म्हणून साजरा केला जातो़ सोलापूरच्या मुख्य कार्यालयातही हा सप्ताह पाळला जात आहे़ येथील कार्यालयातून आजही जवळपास ५० योजना राबविल्या जाताहेत़ जिल्ह्यात पंढरपूर, सोलापूर ग्रामीण आणि शहर अशा तीन विभागांत पोस्टाचे कामकाज होते़ राममंदिर, मोदी पोलीस चौकी अशा ठिकाणी अडकवलेल्या पेट्यांमधून केवळ आठवडाभरातून एकादे पत्र हाती लागते़ यंदा महानगरपालिकेचे आणि त्यांच्या विभागीय कार्यालयातील बहुतांश कर्मचारी हे कोरोनाच्या सेवेत लागले असल्याने यंदा प्रथमच मिळकत कराची बिलेदेखील वाटपाचे काम पोस्ट कार्यालयाला दिले आहे़ महिनाभरात जवळपास १ लाख २० हजार मिळकत कराची बिले वाटप केली आहेत़ याशिवाय दर महिन्याला आरटीओकडून प्राप्त होणारे वाहनांचे दहा हजार लायसेन्स आणि आरसी बुक वितरित होतात़ या कामातून सोलापूर पोस्टाला वर्षाकाठी १ कोटी २० लाखांचा महसूल मिळतो़
कसा आहे सप्ताह
९ आॅक्टोबर
जागतिक पोस्टल दिवस
१० आॅक्टोबर
पोस्टल बँकिंग डे
१२ आॅक्टोबर
पीएलआय डे
१३ आॅक्टोबर
फिलाटेली डे
१४ आॅक्टोबर व्यवसायवृद्धी दिन
१५ आॅक्टोबर- मेल डे