‘आज भी इमानदारी जिंदा हैं... अल्लाह आपका भला करे...’
By appasaheb.patil | Published: November 13, 2019 10:13 AM2019-11-13T10:13:31+5:302019-11-13T10:15:37+5:30
सोलापूरच्या आरपीएफ पोलिसांचा प्रामाणिकपणा; सोन्यासह पाच लाखांचे साहित्य असलेली बॅग परत केली प्रवाशाला
सुजल पाटील
सोलापूर : मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागात असलेल्या कलबुर्गी स्थानकावर सोन्यासह पाच लाखांचे साहित्य असलेली बॅग रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ)च्या कर्मचाºयांना सापडली. बॅगेची तपासणी करून संबंधित प्रवासी महिलेस प्रामाणिकपणे सुपूर्द करण्यात आली. बॅग मिळताच त्या महिलेने आजभी इमानदारी जिंदा हैं... अल्लाह आपका भला करे... अशी सदिच्छा देत निघून गेली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, रविवार १० नोव्हेंबर रोजी कलबुर्गी स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर रेल्वे सुरक्षा बलातील जवान व्ही़ जी़ चव्हाण व रविकुमार हे सुरक्षेची पाहणी करीत होते़ पाहणी करीत असताना त्या जवानांना फुटवेअर ब्रिजजवळ एक निनावी बॅग सापडली.
बॅग कोणाची आहे, याबाबत विचापूस केली असता त्या परिसरातील कोणीचीही ती बॅग आढळून आली नाही़ त्यानंतर त्या जवानांनी ती बॅग पडताळणी व चौकशी करण्यासाठी रेल्वेच्या पोलीस ठाण्यात आणली़ त्यानंतर आरपीएफ निरीक्षकाने त्या बॅगेची पाहणी करून तपासणी केली असता त्या बॅगेत संबंधित प्रवाशाचा मोबाईल नंबर व नाव मिळाले.
त्यानुसार तातडीने रेल्वे पोलिसांनी त्या महिलेस संपर्क साधून महिलेस आपकी पर्स हमें मिली है... जल्द से जल्द आप रेल्वे पुलिस से संपर्क करे... और आपकी बॅग लेकर जाये... असे सांगून बोलावून घेतले. त्यानंतर नसीमोनिया बेगम ही महिला आपल्या नातेवाईकांसह तातडीने रेल्वे पोलीस ठाण्यात दाखल झाल्या. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी ओळख पटवून ती बॅग महिला प्रवाशाच्या हाती सुपूर्द केली. बॅग सुपूर्द करताच त्या महिलेने रेल्वे पोलिसांचे आभार मानले.
काय.. काय.. होते बॅगेत....
- रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांना मिळालेली ही बॅग कलबुर्गी येथील महिला नसीमोनिया बेगम यांची होती. ही महिला गाडी क्रमांक ११०२७ मुंबई-चेन्नई मेल एक्सप्रेसने वाडीकडे जात होती़ वाडीकडे जात असताना संबंधित महिलेने ती बॅग कलबुर्गी स्थानकावर विसरली़ या बॅगेत सोन्याच्या ११ वस्तू होत्या़ त्यात १५० ग्रॅम वजनाचे दागिने होते़ त्यासोबत एक मोबाईल, एक टॅब, कपडे, ज्वेलरी यांसह एकूण पाच लाख रुपयांचा ऐवज होता़
- रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी केलेली प्रामाणिकपणाची कामगिरी खरेच कौतुकास्पद आहे़ या कामगिरीमुळे अन्य रेल्वे पोलीस अधिकाºयांसह कर्मचाºयांमध्ये प्रामाणिकपणाने काम करण्याची इच्छा निर्माण होईल़ रेल्वे सुरक्षा बलातील जवान व्ही़ जी़ चव्हाण व रविकुमार या दोघांना पारितोषिक (रिवॉर्ड) मिळावे, यासाठी मध्य रेल्वे सोलापूर विभागाचे विभागीय व्यवस्थापक हितेंद्र मल्होत्रा यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे़ लवकरच त्यावर निर्णय होईल़
- मिथुन सोनी, सुरक्षा आयुक्त, आरपीएफ पोलीस, मध्य रेल्वे