सोलापूर - व्यंकट रमणा गोविंदा गोविंदा...चा जयघोष आता रेल्वे डब्यातही घुमू लागला आहे. गेल्या काही महिन्यांपासून सोलापूरहून तिरूपती बालाजीच्या दर्शनासाठी जाणार्या भाविकांची संख्या वाढल्याने तिरूपतीला जाणार्या चारही विशेष एक्सप्रेस गाड्या हाऊसफुल्ल धावत आहेत. या चारही गाड्यांचे आरक्षण मिळता मिळत नसल्याने शेकडो प्रवाशांना वेटिंगच करावे लागत असल्याचे सांगण्यात आले.
कोरोना रूग्णसंख्याकमी झाल्याने अनलॉकचा निर्णय झाला. अनलॉकच्या निर्णयात सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेबरोबरच रेल्वे प्रवासाला सुरूवात झाली. अनलॉकनंतर पहिल्या दोन दिवसात रेल्वेला प्रतिसाद कमी मिळाला असला तरी नंतर हळूहळू रेल्वेची प्रवासी वाहतुक रूळावर येऊ लागली आहे. सध्या पुणे, मुंबई बरोबरच बालाजीच्या दर्शनासाठी जाणार्या सोलापुरातील भाविकांची संख्या मोठया प्रमाणात दिसून येत आहे. दररोज सोलापूर रेल्वे स्थानकावरून दोन ते तीन एक्सप्रेस तिरूपतीला जातात अन् येतात. जास्त अंतर, कमी खर्चात प्रवास अन् दर्शन होत असल्याने अनेकजण रेल्वेने जाण्याचा पर्याय निवडत आहेत.
-----------
या गाड्या जातात सोलापुरातून
- उद्यान एक्सप्रेस
- चेन्नई एक्सप्रेस
- मदुराई एक्सप्रेस
- तिरूपती एक्स्प्रेस
- गदग एक्सप्रेस
- हैद्राबाद एक्सप्रेस
- निजामुद्दीन एक्सप्रेस
------------------
विजयपूर मार्गावर प्रवासी मिळेनात...
कोरोनामुळे विजयपूर मार्गावर धावणारी हसन व बसव एक्सप्रेस रद्द करण्यात आली. शिवाय निजामाबाद एक्सप्रेसही बंद करण्यात आली. त्यानंतर रेल्वेचे प्रवासी एसटी व खासगी वाहनाने प्रवास करू लागले. सध्या विजयपूर मार्गावर काही गाड्या धावत असल्या तरी या मार्गावरील रेल्वे गाड्यांना प्रवाशी मिळत नसल्याचे सांगण्यात आले.
सर्वाधिक वेटिंग तिरूपती एक्स्प्रेसला
सोलापूर शहरातून दररोज १ हजारहून अधिक भाविक बालाजीच्या दर्शनाला तिरूपतीला जात आहेत. त्यामुळे या मार्गावर धावणारी तिरूपती, चेन्नई, मदुराई या तीन गाड्यांच्या तिकिटाला वेटिंगच दाखवित असल्याचे प्रवाशांनी सांगितले. तिरूपतीला जाणार्या गाड्या हाऊसफुल्लच दिसून येत आहेत.
पॅसेजर कधी सुरू होणार ?
कोरोनामुळे रेल्वे मंत्रालयाने नियमित रेल्वे प्रवासी गाड्या बंद केल्या. याचवेळी पॅसेजर गाड्याही बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. दरम्यान, प्रवाशांना अडचण येऊ यासाठी अत्यावश्यक लोकांसाठी विशेष एक्सप्रेस चालविण्याचा निर्णय घेतला. त्याच गाड्या सध्या धावत आहेत. सर्वसामान्यांना परवडणारी रेल्वेची पॅसेजर सेवा कधी सुरू होणार असा सवाल रेल्वे प्रवासी संघटनेचे सचिव राजू कांबळे यांनी रेल्वे प्रशासनाला विचारला आहे.