माजी सैनिक हाकणार धोत्रे ग्रामपंचायतीचा कारभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:11 AM2021-01-08T05:11:44+5:302021-01-08T05:11:44+5:30
बार्शी : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानंतर निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे़ नेत्यांनी केलेल्या बिनविरोधच्या आवाहनाला ...
बार्शी : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानंतर निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे़ नेत्यांनी केलेल्या बिनविरोधच्या आवाहनाला प्रतिसाद देत स्थानिक पातळ्यावर गटा-गटांमध्ये मनोमिलन झाले. अन् तालुक्यातील १६ गावच्या निवडणुका या बिनविरोध झाल्या आहेत़ यामध्ये धोत्रे ग्रामपंचायतीची निवडणूक प्रथमच बिनविरोध झाली. त्यातही देशसेवा केलेल्या माजी सैनिकांना आणि त्यांच्या ‘सौ.’ गावचा कारभार हाकण्यासाठी संधी दिली गेली.
धोत्रे हे बार्शीपासून १२ किलोमीटरवर असणारं छोटेसं २ हजार लोकसंख्येचे गाव़ गावात सर्व जाती-धर्माची घरे आहेत़ आजवर येथे पक्षीय राजकारण चालायचे़ त्यामुळे गट-तट आलेच़ यामुळे आजवर निवडणूक कधी बिनविरोध झाली नाही़ गावात तीन प्रभाग असून, नऊ ग्रामपंचायत सदस्य आहेत़ तर १,३१३ एवढे मतदान आहे़ इथल्या नागरिकांचा शेती हाच प्रमुख व्यवसाय. नोकरदारांची संख्याही बऱ्यापैकी आहे़ मध्यमवयस्क व वयोवृध्द असे ३४ माजी सैनिक आहेत़ तर १५ सैनिक सध्या ऑनड्युटी आहेत़
यंदा ग्रामपंचायतीची निवडणूक लागल्यानंतर आजवर देशसेवा करून सेवानिवृत्त झालेल्या माजी सैनिकांनी आजवर आम्ही देशसेवा केली आहे़ त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत सर्व गावकऱ्यांनी आम्हाला बिनविरोध निवडून देऊन गावाची सेवा करण्याची संधी द्यावी, अशी इच्छा बोलून दाखवली़ त्यानुसार गावकऱ्यांनी तयारी पण दाखवली़ मात्र १७ उमेदवारी अर्ज दाखल दाखल झाले आहे़ या सर्व माजी सैनिकांनी आम्हाला सर्व जागा बिनविरोध द्या़ एखाद्याने जरी अर्ज ठेवलाच तर आम्ही सर्व जण माघार घेणार अशी भूमिका जाहीर केली होती़ त्यानुसार मंगळवारी माजी सैनिक सोडून इतर सर्व आठ जणांनी अर्ज माघारी घेतल्याने सर्व नऊ सदस्य अविरोध निवडून आले़
-----बिनविरोध अन् माघार घेतलेल्यांचा सन्मान---
मंगळवारी सकाळी सर्व गावकऱ्यांनी एकत्र येत बिनविरोध निवडून आलेल्यांचाच नव्हे तर ज्यांनी अर्ज माघारी घेऊन मनाचा मोठेपणा दाखवला. सैनिकांप्रती आदर व्यक्त केला. त्या आठ जणांचाही सन्मान करण्यात आला.
हे आहेत बिनविरोध निवडलेले सदस्य
सचिन शहाजी लांडे, शालन चंद्रकांत घोडके, नंदा दत्तात्रय सुरवसे, सुमन प्रभू जाधवर, गणेश मालोजी मोरे, उल्लतबी जमादार शेख, वंदना मोहन जाधवर, मंगल सुरेश जाधवर, बुवासाहेब रामचंद्र बोकेफोडे या सर्व माजी सैनिक व माजी सैनिकांच्या पत्नीचा बिनविरोध निवडून आलेल्यांमध्ये समावेश आहे़
------