सोलापूर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळ विभागाकडून औषधनिर्माणशास्त्र शाखेतील विद्यार्थ्यांची परीक्षा एकाच महिन्यात घेऊन उत्तरपत्रिका तपासणी तातडीने केली. अवघ्या आठ दिवसात निकाल जाहीर केल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. श्रीकांत कोकरे यांनी दिली.
विद्यापीठ परीक्षांचे निकाल वेळेत लागावेत, यासाठी राज्यातील अनेक विद्यापीठे सदैव प्रयत्नशील असतात. परीक्षांचा निकाल ४५ दिवसांत जाहीर करणे अनिवार्य असते, मात्र प्रत्यक्षात ही कालमर्यादा अनेकदा पाळणे अशक्य असते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने औषधनिर्माणशास्त्र शाखेतील द्वितीय, तृतीय आणि अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा २ ते २२ मे या कालावधीत घेऊन अवघ्या आठ दिवसात म्हणजे ३१ मे रोजी या परीक्षांचे निकाल विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहेत.
परीक्षा झाल्यानंतर खूपच अल्प कालावधीत निकाल जाहीर झाल्याने विद्यार्थी तसेच पालक व प्राध्यापकांमधून समाधान व्यक्त होत आहे. इतक्या कमी वेळात निकाल जाहीर होण्याची विद्यापीठाच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ असून अशा प्रकारची यशस्विता क्वचितच अन्य विद्यापीठांना प्राप्त करता येत असल्याची माहिती डॉ. कोकरे यांनी दिली. कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून अनेक संकल्पना राबवित गोपनीयता, पारदर्शकता तसेच विश्वासार्हता वाढविण्यासाठी प्रयत्न होत आहेत. याच प्रयत्नातून औषधनिर्माणशास्त्र शाखेतील द्वितीय, तृतीय आणि अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा वेळेत घेऊन वेळेच्या आधी निकाल जाहीर करण्यात विद्यापीठ परीक्षा विभागाला यश मिळाले आहे.
इतर विद्याशाखांचेही निकाल वेळेत व लवकर जाहीर करण्यासाठी संबंधित अभ्यासक्रमाच्या शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासण्यासाठी सहकार्य करावे, अशी अपेक्षा डॉ. कोकरे यांनी व्यक्त केली आहे.