सोलापूर : भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण रस्ते आणि राज्यमार्ग मंत्रालय भारत सरकारच्या वतीने सोलापूर अक्कलकोट राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १५० हा नवीन रस्ता करण्यात आला आहे. २० सप्टेंबर, २०२१ पासून या मार्गावरून प्रवास करण्याकरिता आता वाहनधारकांना टोल भरावे लागणार आहे. त्याची सुरुवात झाली आहे, परंतु या टोल नाका परिसरातील १५ ते २० किलोमीटरपर्यंतच्या वाहनधारकांना टोलमाफी करावी. हा राष्ट्रीय महामार्ग होताना, ज्यांच्या जमिनी, शेती यामध्ये गेल्या आहेत, त्यांना प्रथम प्राधान्याने सवलत मिळावी. स्थानिक रहिवाशांना, तसेच प्रकल्पग्रस्तांना टोल नाक्यावर काम करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी दक्षिण सोलापूर प्रहार जनशक्ती संघटनेने केली आहे.
स्थानिक रहिवाशांना टोलमाफी द्यावी, त्वरित टोल आकारणी थांबवा, अन्यथा प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता मस्के पाटील, शहराध्यक्ष अजित कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी, २२ सप्टेंबर रोजी तोडफोड आंदोलन आंदोलन करणार असल्याचा इशारा दक्षिण सोलापूर तालुका प्रहार संघटनेचे अध्यक्ष मोहसिन तांबोळी यांनी दिला आहे.
सोलापूर अक्कलकोट हा राष्ट्रीय महामार्ग अत्यंत चांगल्या पद्धतीने झाला आहे. यामध्ये काही दुमत नाही, परंतु येथील स्थानिक रहिवाशांना आपल्या विविध कामांसाठी दिवसातून चार-ते पाच वेळा सोलापूर, अक्कलकोटसाठी जावे लागते. प्रत्येक वेळेस त्यांच्याकडून टोल घेण्यात येतो, परंतु हे सामान्य नागरिकांना परवडणारे नाही. सोलापूर-अक्कलकोट या राष्ट्रीय महामार्गावर अजून कामे सुरू आहेत. काम हे पूर्णपणे झाले नाही, तरीही टोल आकारण्यात येत आहे. या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असताना, कंत्राटदाराच्या बेजबाबदारपणामुळे १०० ते १५० लोकांचे अपघात या मार्गावर झाले आहेत. काहींना आपला जीवही गमवावा लागला आहे. याला जबाबदार कोण? त्यांना नुकसान भरपाई मिळणार का? असाही सवाल उपस्थित होत आहे. अगोदर सर्व कामे मार्गी लावा, मगच टोल आकारणी करा, अशी मागणी केली.
---
या टोल नाका परिसरातील १५ ते २० किलोमीटर अंतरातील गावातील नागरिकांच्या वाहनांना टोलमाफी मिळालेच पाहिजे, अन्यथा या पुढील काळात प्रहार संघटना तोडफोड आंदोलन करेल. वेळप्रसंगी टोल प्लाझा बंद पाडू.
- मोहसिन तांबोळी, प्रहार संघटना अध्यक्ष, ता.दक्षिण सोलापूर.