शिवानंद फुलारी
अक्कलकोट: जिद्द, चिकाटी, इच्छाशक्ती असली की कुठल्याही क्षेत्रात यश मिळू शकते. याचे मूर्तिमंत उदा. म्हणजे अक्कलकोट तालुक्यातील गौडगाव बु़ येथील प्रगतिशील शेतकरी केदार शिवकुमार बमदे यांनी ठिबक सिंचनाद्वारे गुजराती सिड्सचे ‘स्वाती महाराणी’ या सुधारित काकडीचे वाण लावून साडेतीन महिन्यांत एकरी लाखाचे उत्पन्न काढले.
पूर्वीच्या काळी बमदे यांच्या कुटुंबात पारंपरिक शेती केली जात असे, त्यास फाटा देत केदार यांनी सुधारित शेती करण्यास सुरुवात केली. त्यांनी आजवर विविध प्रकारची फळपिके घेतलेली आहेत. त्यापैकी काकडीचे वाण हे एक आहे. गेल्या आॅक्टोबर महिन्यात सुधारित ‘स्वाती महाराणी’ नावाच्या काकडीच्या वाणाची दोन एकरामध्ये लागवड केली. त्यासाठी सुधारित पद्धतीने ठिबक सिंचनाद्वारे नियोजन करून टोकन पद्धतीने लावले. केवळ ४० दिवस व्यवस्थित रोगराईवर लक्ष देऊन निगराणी केले. काकडी काढणीला सुरुवात झाली. चांगल्या प्रकारे दर मिळाला. या दोन एकराच्या माध्यमातून खर्च वजा जाता तब्बल दोन लाख रुपये उत्पन्न मिळाले. यासाठी कृषी विभागाकडून योग्य मार्गदर्शन लाभले आहे. एकूणच माणसाकडे जिद्द,चिकाटी, प्रबळ इच्छाशक्ती असली की, कुठल्याही क्षेत्रात माणूस यश मिळवू शकतो. हे मूर्तिमंत उदाहरण अक्कलकोट तालुक्यात पाहायला मिळत आहे.यासाठी कृषी सहायक चिदानंद खोबण तसेच शेतकरी महांतेश बमणगी, हणमंतराय बिराजदार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे बमणी यांनी सांगितले.
अशी केली लागण आॅक्टोबर-१९ मध्ये जमीन मशागत करण्यात आली. सहा फूट अंतरावर सºया सोडण्यात आल्या. त्यावर मल्चिंग पेपर टाकून ड्रीप अंथरण्यात आले. जिगजाग पद्धतीने सव्वा फूट अंतरावर एक या अंतराने एक बिया टोकण करण्यात आले. दरम्यान नागणे, करपा, दवणी यासारख्या रोगांवर नियंत्रण मिळवण्यासाठी चांगल्या प्रकारे औषध फवारणी करण्यात आली़ केवळ ४० दिवसांत काकडीचे तोड सुरुवात झाली. बघता बघता एक महिना सिझन चालू राहिला. त्यामध्ये दोन एकराच्या जमिनीत खर्च वजा जाता दोन लाख रुपये केवळ साडेतीन महिन्यांत मिळाले आहे.
एकरी ६०० कॅरेट माल - एकरी साधारण ६०० कॅरेट काकडी निघाली. प्रत्येक कॅरेटला तब्बल ६५० रुपयांचा उच्चांकी दर मिळाला. यासाठी कर्नाटक राज्यातील कलबुर्गी व अक्कलकोट अशा दोन बाजारपेठेत या मालाची विक्री करण्यात आली. कृषी विभागाकडून ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेतून संबंधित शेतकºयांना लाभ देण्यात आला आहे.
पूर्वी आम्ही पारंपरिक पद्धतीने करायचो. गेल्या काही वर्षांपासून सुधारित पद्धतीने शेती करून, एकरी लाखो रुपयांचे उत्पन्न केवळ तीन महिन्यांत मिळत आहे. कलिंगड,काकडी यासारख्या नवजातीचे बियाणे लावून मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतो. माझे बघून अनेकांनी अशा पद्धतीने शेती करण्याचा प्रयत्न चालविला आहे- केदार बमदे, शेतकरी