ठाकरेंवर निष्ठा व्यक्त करताना स्पष्ट सूचना, एकनाथ शिंदेंवर शिवसैनिकांनी टीका करू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2022 10:52 AM2022-06-24T10:52:55+5:302022-06-24T10:53:00+5:30
सोलापुरात शिवसैनिकांची विश्रामगृहात बैठक : बरडेंनी मात्र शहाजीबापूंना पाठवलं थेट पाकिस्तानात
सोलापूर : राज्यातील नाट्यमय राजकीय घडामोडींनंतर शहर अन् जिल्ह्यातील शिवसैनिकांनी बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निष्ठा व्यक्त केली, मात्र त्याच वेळी या बैठकीत एकनाथ शिंदे यांच्यासह कोणावरही टीका करू नका, असे सातत्याने सांगितले गेले. त्यामुळे शिंदेंवर कुणीही आरोप केेला नाही; मात्र जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी सांगोल्याचे शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील यांना मात्र ते गुवाहाटीलाच काय, बोलावणं आलं तर पाकिस्तानलाही जातील, असा टोला लगावला.
शिवसेनेचे नेते नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे ४० आमदारांसह गुवाहाटी येथे गेले आहेत. शिवसेनेची सत्ता धोक्यात आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. याच पार्श्वभूमीवर गुरुवारी दुपारी १२ वाजता सोलापूर शहर व जिल्ह्यातील शिवसैनिकांची बैठक शासकीय विश्रामगृहात बोलावण्यात आली होती. बैठकीला माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे, जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बरडे, प्रताप चव्हाण, बार्शीचे भाऊसाहेब आंधळकर, मोहोळचे दीपक गायकवाड, शहर प्रमुख नगरसेवक गुरूशांत धुत्तरगांवकर, चंद्रकांत वानकर, माजी नगरसेवक गणेश वानकर, अस्मिता गायकवाड, अजय दासरी, लहू गायकवाड, महेश धाराशिवकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
आपल्याला संघर्ष नवा नाही, त्यामुळे सध्याच्या परिस्थितीवर कोणीही चिंता करायची नाही. जे होईल ते होईल, सत्ता असो किंवा नसो, आपण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहायचे आहे, अशा भावना काहींनी व्यक्त केल्या. यापूर्वी छगन भुजबळ, नारायण राणे असे कित्येक नेते निघून गेले, शिवसेनेला काही फरक पडला नाही, असेही म्हणाले. दरम्यान, पुरुषोत्तम बरडे म्हणाले, आपल्या जिल्ह्यातील शहाजी पाटील हेही गुवाहाटीला गेले आहेत, त्यांना जर पाकिस्तानची ऑफर आली असती तर ते तिथेही गेले असते, असा टोला त्यांनी लगावला. मात्र प्रत्येक वेळी गुरूशांत धुत्तरगावकर हे एकनाथ शिंदे यांच्यावर व इतर कोणावरही टीका करायची नाही, याची जाणीव करून देत होते. यावेळी जिल्हा महिला आघाडी प्रमुख अस्मिता गायकवाड यांनी मनोगत व्यक्त करताना आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
बैठकीला दोन नगरसेवक उपस्थित
- शहरात एकूण २२ नगरसेवक आहेत, त्यापैकी फक्त गणेश वानकर अन् गुरूशांत धुत्तरगावकर हे दोघे सोडले तर अन्य कोणी उपस्थित नव्हते. अमोल शिंदे, मनोज शेजवाल, माजी शहर प्रमुख हरी चौगुले आदी अलीकडच्या काळात सेनेत सक्रिय होते. कोठे गटाच्या नगरसेवकांनी राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे ते बैठकीत उपस्थित नव्हते.