आप्पासाहेब पाटील
सोलापूर : नवीन दंड आकारणी नंतर सोलापूर जिल्ह्यातील वाहनचालक वाहतूक नियमांचे पालन करतील, अशी अपेक्षा होती. मात्र ग्रामीण भागातील बरेच दुचाकी वाहनचालक ' हम नही सुधरेंगे ' च्या तोऱ्यात असल्याचे दिसून येत असतात. मागील वर्षभरात सोलापूर ग्रामीण पोलिसांनी १३ हजार ३ दुचाकीस्वारांना हेल्मेट न घातल्याबद्दल कारवाई करून त्यांच्याकडून ६५ लाख १ हजार ५०० रूपयांचा दंड ठोठावला असल्याचे जिल्हा वाहतूक शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांनी लोकमतशी बोलताना दिली.
सुरक्षा उपकरणे ही रोजच्या जीवनात उपयोगी केली जातात, जसे तांत्रिक काम करत असताना, साहित्य हाताळताना हातमोजे वापरणे, प्रदूषणापासून डोळ्यांचे रक्षण करण्यासाठी गाॅगल्स घालणे. तीव्र उन्हापासून मस्तकाचे संरक्षण व्हावे याकरता उन्हाळ्यात टोपी परिधान करणे, इ. लोकांच्या सवयी बदलल्या जाऊ शकतात. कोरोनामुळे आपण मास्क तर घालायला लागलो पण ज्या देशात १.५ लाख लोक रस्ते अपघातामुळे मरतात, त्या देशात लोक हेल्मेट कधी घालणार असाही सवाल उपस्थित होत असल्याचे एका सुज्ञ नागरिकाने सांगितले.
----------
पंधराशे रूपयांपर्यंत होऊ शकतो दंड...
वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर नवीन नियमाप्रमाणे दंड आकारण्यात येत आहे. हेल्मेट न वापरणाऱ्या वाहनचालकांना पहिल्या गुन्ह्यात पाचशे रुपये आणि त्यानंतरच्या प्रत्येक गुन्ह्यात पंधराशे रुपये दंड आकारण्यात येणार असल्याचे राज्याच्या वाहतूक शाखेच्या अतिरिक्त पोलीस महासंचालक कार्यालयाने स्पष्ट केले आहे.
----------------
साेलापूर जिल्ह्यातील लोक मास्क घातलेली पाहतो त्यावेळी मला प्रश्न पडतो ह्या लोकांनी मास्क वापरणे किती कमी कालावधीत स्वीकारले आहे. मग हेच हेल्मेटच्या बाबतीत दुचाकी चालकांकडून का होत नाही ? हेल्मेट घातल्यास लाखो लोकांचे जीव वाचतील. दुचाकी चालविताना जिल्ह्यातील वाहनधारकांनी हेल्मेटचा वापर करून वाहतूक पोलिसांकडून होणारी कारवाई टाळावी.
- मनोजकुमार यादव, पोलीस निरीक्षक, जिल्हा वाहतूक शाखा, सो लापूर ग्रामीण.
------------
२०२१ वर्षातील हेल्मेट विरोधातील कारवाई
महिना - विना हेल्मेट - एकूण दंड
जानेवारी - ३५२ - १ लाख ७६ हजार
फेब्रुवारी - ४५५ - २ लाख २७ हजार ५००
- मार्च - ३७० - १ लाख ८५ हजार ०००
- एप्रिल - २४३-१ लाख २१ हजार ५००
- मे - ६०२ - ३ लाख १ हजार
- जून - ३१४९ - १५ लाख ७४ हजार ५००
- जुलै - २०७३ - ९ लाख ५७ हजार ५००
- ऑगस्ट - १९१५ - ९ लाख ५७ हजार ५००
- सप्टेंबर - १२३३ - ६ लाख १६ हजार ५००
- ऑक्टोबर - ११८९ - ५ लाख ९४ हजार ५००
- नोव्हेंबर - ८६२ - ४ लाख ३१ हजार
- डिसेंबर २८ पर्यंत - ५६० - २ लाख ८० हजार