याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पडसाळी (ता. माढा) येथील अनिल नागन्नाथ देशमुख (वय ४८, शेतकरी) यांना आठ दिवसांपूर्वी एका अनोळखी मोबाईल नंबरवरून मिस कॉल आला. त्यानंतर त्यांनी या नंबरवर फोन करून चौकशी केली. तो नंबर वनिता पवार या महिलेचा असल्याचे समजले. परिचय नसल्याने देशमुख त्या वेळी जास्त काही बोलले नाहीत व फोन बंद केला. त्यानंतर पुन्हा त्याच नंबर वरून वनिता पवार फोन करून सारखेच बोलू लागली. तिने मोहोळ येथे आपण भेटूयात, असे म्हणून मोहोळला बोलावून घेतले. त्यानुसार देशमुख ३० मार्च रोजी सकाळी पावणेदहा वाजण्याच्या सुमारास एकटेच पडसाळी येथून दुचाकीवर वनिता पवार यांना भेटण्यासाठी मोहोळ येथे आले.
मोहोळ येथील हॉटेलवर वनिता पिंटू पवार व तिच्यासोबत प्रीती लखन चव्हाण (रा. यल्लमवाडी ता. मोहोळ) व माही नितीन काळे (रा. मानेगाव ता. माढा) अशा तिघी मिळून होत्या. तिघीनीही अनिल देशमुख हे हॉटेलमध्ये गेल्यावर आपण चहा पिऊ, असे म्हणून आतमध्ये घेऊन गेल्या. त्या वेळी तिघीनीही पायातील चपला काढून अनिल देशमुख यांच्या तोंडावर मारण्यास सुरुवात केली. शिवीगाळ दमदाटी करत चाकूचा धाक दाखवून खिशातील रोख आठ हजार रुपये, एटीएम कार्ड असे बळजबरीने काढून घेतले, असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी वरील तिन्ही महिलांच्या विरोधात गुन्हा नोंदला अधिक तपास पोलीस हवालदार मालती नांगरे-देशमुख करीत आहेत.
-----
पोलिसात गेल्यास छेडछाडीचा गुन्हा
तू जर पोलिसात तक्रार केली तर आम्ही तुझ्या विरोधात छेडछाड व बलात्काराचा गुन्हा दाखल करतो, यासह जीवे मारण्याची धमकी दिली असेही फिर्यादीत म्हटले आहे.