दक्षिण सोलापूर : उजनी धरणातून सीना नदीत सोडलेले पाणी अद्यापपर्यंत पोहोचले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी वडकबाळ पुलावर अचानक ठिय्या दिला. टेल टू हेड बंधारे भरून देण्याची मागणी या शेतकऱ्यांनी लावून धरली.
सीना नदीला पाणी सोडण्यात आले आहे. गेल्या महिन्यापासून कोरडी पडलेली सीना नदीतील बंधारे भरण्याची मागणी नदीकाठच्या शेतकऱ्यांनी केली होती. अधिकारी पाणी सोडल्याचे सांगत आहेत; पण पाणी दक्षिण तालुक्यापर्यंत अद्याप तरी पोहोचले नाही. पिके वाळत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आज सकाळी अचानक वडकबाळ पुलावर ठिय्या दिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि जिल्हा परिषदेचे माजी सभापती अप्पाराव कोरे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. दरम्यान सुमारे अर्धा तास सोलापूर-विजयपूर महामार्गावरची वाहतूक रोखली होती.
मंद्रुप पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन थेटे यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. भीमा विकास विभागाचे कार्यकारी अभियंता रमेश क्षीरसागर यांच्याशी संपर्क साधून शेतकऱ्यांशी त्यांचा संवाद घडवून आणला. त्यानंतर ठिय्या आंदोलन स्थगित करण्यात आले.
या आंदोलनात विलास लोकरे, वडकबाळचे सरपंच सद्दाम शेख, माजी सरपंच मलकारी पुजारी, सुरेश पुजारी, सुनील व्हनमाने, तिपन्ना पुजारी, पप्पू पुजारी, अमोगसिद्ध पुजारी, नागनाथ पुजारी, हतूरचे रमेश पाटील, ज्योत्याप्पा पुजारी यांच्यासह ५०-६० शेतकरी सहभागी झाले होते.
----
चार दिवसांत पोहोचेल पाणी
आजच सकाळी मोहोळ शाखा कालव्यातून १५० क्यूसेकने सीना नदीत पाणी सोडले जात आहे. नदी कोरडी असल्याने पात्रातील खड्डे भरत, अडथळे पार करीत पाण्याचा प्रवास होणार आहे. दुपारी पाणी अर्जुनसोड बंधाऱ्यात आले आहे. मार्गातील ६ को. प. बंधारे भरून वडकबाळपर्यंत पाणी येण्यासाठी आणखी किमान चार दिवस लागतील. कोर्सेगाव बंधाऱ्यात सहा दिवसांनी पाणी स पोहोचेल, अशी माहिती भीमा कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता रमेश क्षीरसागर यांनी दिली.
-------
महिनाभरापासून सीना नदी कोरडी पडल्याने पिकांची अवस्था दयनीय झाली आहे. नेहमीच ‘टेल टू हेड’ हा नियम डावलला जातोय. चार दिवसांत पाणी आले नाही तर १ मे रोजी तीव्र आंदोलन करणार आहोत.
- अप्पाराव कोरे, माजी सभापती जिल्हा परिषद