सोलापूर : पावसाचा कहर अशात काढणीला आलेला सोयाबीन हातचे जाण्याची भीती. बाजारात भाव कोसळलेला असतानाही इकडे मजुरीत मात्र दुपटीने वाढ झाल्याने शेतकऱ्यांवरील संकटे काही कमी होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
सोयाबीन काढणीला असतानाच परतीच्या पावसाने जिल्ह्याला झोडपले आहे. त्यामुळे शेतात तळी साचली असून, सोयाबीन हातचे जाण्याची भीती वाढली आहे. त्यामुळे चिखलात हाती लागेल ते पीक पदरात पाडून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी घाई सुरू केली आहे. सोयाबीन काढणीसाठी मजूर मिळत नसल्याने साहजिकच मजुरीच्या दरातही वाढ झाली आहे. इकडे गेल्या महिन्यात प्रति क्विंटलला १२ हजारांवर गेलेला भाव आता निम्म्यावर आला आहे. मात्र, मजुरीचे भाव वाढल्याने शेतकऱ्यांच्या नुकसानीत भर पडली आहे. काढणी झाली तरी मळणी करण्यासाठी मशीनला वेटिंगवर राहावे लागत आहे. डिझेल दरात भरमसाट वाढ झाल्याने मळणीच्या दरातही २५ ते ५० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
काढणीचे असे आहेत दर
- पुरुष मजुरी : ५००
- महिला मजुरी : ३५०
- एकरी काढणी : ४५००
मजूर मिळेनात...
जिल्ह्यात बार्शी, उत्तर व दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, मोहोळ तालुक्यांत सोयाबीनचे पीक आहे. सध्या सर्वत्र पीक काढणीत असल्याने मजुरांची वाणवा आहे. पूर्वी पुरुष मजुरांना ३५०, तर महिलांना २०० रोजगार होता. एकरी ३५०० हजाराला गुत्ता होता तो आता ४५०० झाला आहे. आता चिखलात सोयाबीनची काढणी करावी लागत असल्याने वाढवून दर द्यावे लागत आहेत. याशिवाय मजूर आणण्यासाठी वाहन पाठवावे लागते.
शेतकऱ्यांच्या पदरात काय पडणार...
सोयाबीनला चांगला भाव मिळतो म्हणून लागवड केली. सुरुवातीला पावसाने ओढ दिल्याने पीक जेमतेम आले. आता पीक काढणीला असताना पावसाने जोर केला आहे. हाती आलेले पीक जाऊ द्यायचे नाही म्हणून मजुरी वाढलेली असली तरी पीक काढणे क्रमप्राप्त आहे. अशात सोयाबीनचे भाव पडले आहे.
- विठ्ठल साठे, शेतकरी
पीक काढणीला असतानाच पावसाने जोर केला. त्यामुळे हातचे आलेले पीक जाऊ नये म्हणून एक हजार वाढवून गुत्ता दिला आहे; पण सोयाबीनचे दर पडले आहेत. दिवाळीच्या तोंडावर महागाई असताना शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आहे. डिझेलदरवाढीने मळणीचे दर वाढविण्यात आले आहेत.
- श्रीराम चव्हाण, शेतकरी
जिल्ह्यातील सोयाबीन क्षेत्र (हेक्टरमध्ये)
- उ. सोलापूर : ४८६५
- द. सोलापूर : ३७६४
- बार्शी : ४९२७३
- अक्कलकोट : ५९२५
- मोहोळ : ४१४६
- माढा : ०२६
- करमाळा : ००६
- पंढरपूर : ११४
- सांगाेला : ००९
- माळशिरस : १३४
- मंगळवेढा : ०२९