सांगोला : चोरीच्या भीतीने मायलेकींनी गव्हाच्या डब्यात ठेवलेले ४ लाख ६५ हजारांचे साडे पंधरा तोळे सोन्याचे दागिने अन् रोख ३० हजार रुपये असा सुमारे ४ लाख ९५ हजार रुपयांचा ऐवज चोरून चोरट्यांनी पोबारा केला.
ही घटना शुक्रवारी रात्री १० वाजण्यापूर्वी सांगोला तालुक्यात किडेबिसरी येथे घडली. याबाबत भूमिका रुपेश हातेकर (रा. किडेबिसरी) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. फिर्यादी भूमिका हातेकर यांची आई मंगल करडे या पुणे येथून मुलीकडे गावी आल्या होत्या. येताना त्यांनी तिचे व मुलगी भूमिकाचे या दोघींचे मिळून १५.५ तोळे सोन्याचे दागिने व रोख ३० हजार रुपये रक्कम सोबत घेऊन आल्या होत्या. हे दागिने त्यांनी पाकिटात ठेवून ते घरात गहू असलेल्या डब्यात ठेवले. हा डबा भिंतीला असलेल्या कपाटात ठेवला. उष्णतेचा त्रास होत असल्यामुळे ती आणि तिची आई व मुले सारेचजण घराला आतून कडी लावून वरच्या खोलीत झोपी गेले.
दरम्यान शनिवारी सकाळी ७ च्या सुमारास त्या झोपेतून उठून खाली आल्या. येताना दागिन्याचे पाकीट घेऊन घरातील गव्हाच्या डब्यात ठेवले. दिवसभर त्यांच्या मुलांच्या सोबत खेळण्याकरिता शेजारची मुलेही आली. भावकीतील महिला ही घरात गप्पा मारत बसल्या होत्या. दरम्यान चोरट्यांनी त्यांची नजर चुकवून सहा तोळे सोन्याचे गंठण, दीड तोळे सोन्याचे लक्ष्मीहार, अडीच तोळे सोन्याची मोहनमाळ, एक तोळे सोन्याचे कर्णफुले, टॉप्स, साखळी, दीड तोळे सोन्याची चेन, एक तोळे सोन्याचे तीन पदरी माळेतील जुंधळे मणी, एक तोळे सोन्याचे मिनी गंठण, एक तोळे सोन्याची अंगठी, दोन लहान बदाम, तीन बुगड्या असा सुमारे साडेपंधरा तोळे सोन्याचे दागिने व रोख ३० हजार असा सुमारे ४ लाख ९५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
---
डब्यात हात घालताच दागिने गायब
त्याचदिवशी रात्री १० च्या सुमारास मायलेकी झोपण्यासाठी जात असताना गव्हाच्या डब्यात हात घातला असता दागिन्याचे पाकीट हाती लागले नाही. दाराच्या पाठीमागील पिशवीतील पैशाचे पाकीट आहे का? तेही पहिले असता मिळून आले नाही. मायलेकींनी शोधाशोध केली असता ते मिळून आले नाही. त्यांनी दीर प्रवीण हातेकर यांना फोनवरून याची माहिती दिली.