अक्कलकोट : शेतातील वहिवाट रस्त्याच्या कारणावरून भावकीतील दोन गटात हाणामारीचा प्रकार घडला. या हाणामारीत पाच जण जखमी झाले. या दोन्ही गटाने परस्पर विरोधात फिर्याद दिली असून, ३१ मार्च रोजी नागणसूर (ता.अक्कलकोट) येथे ही घटना घडली. रात्री उशिरा दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
पोलीस सूत्रांकडील माहितीनुसार फिर्यादी गिरमला गंगोंडा यांनी भावकीतील शेतातून रस्त्यासाठी अक्कलकोट तहसील कार्यालयात अर्ज केला होता. याचा मनात राग धरून चंद्रकांत गंगोंडा, सिद्धाराम गंगोंडा, कलप्पा गंगोंडा, शरणप्पा गंगोंडा, नागप्पा गंगोंडा, शिवशरण गंगोंडा यांनी धारधार शस्त्राने त्यांच्या हल्ला चढवला. या हल्ल्यात गौरीशंकर गंगोंडा, गिरमला गंगोंडा, भीमाशंकर गंगोंडा हेदेखील जखमी झाले आहे. या जखमींना सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या हल्ल्याचा तपास पोलीस नायक कोळी करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत चंद्रकांत गंगोंडा यांनी फिर्याद दिली आहे. गिरमला गंगोडा यांनी रस्त्याच्या मागणी अर्जाला चंद्रकांत गंगोंडा यांनी हरकत घेतली होती. या अर्जाला हरकत का घेतली म्हणून आरोपी बंडेप्पा गंगोंडा, गिरमलप्पा गंगोंडा, गौरीशंकर गंगोंडा, भीमाशंकर गंगोंडा, अर्जुन गंगोंडा, सागर गंगोंडा (सर्व रा. नागणसूर) यांनी केलेल्या मारहाणीत चंद्रकांत गंगोंडा, सिद्धाराम गंगोंडा गंभीर जखमी झाले आहेत. ऊसतोडीचा कोयता, लोखंडी रॉड, कुऱ्हाडीचा दांडका या हत्यारांनी हल्ला चढविला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक काळे करीत आहेत.
या दोन्ही घटना ३१ मार्च रोजी रात्री ८.३० वाजता घडल्या. त्यांना उपचारार्थ सोलापूर येथे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.